खांदेश्वर येथील सिडको गृहनिर्माण प्रकल्पामुळे प्रवाशांची गैरसोय

पनवेल : सिडकोने खांदेश्वर आणि मानसरोवर रेल्वे स्थानकासमोर अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरांचा प्रकल्प हाती घेतला आहे, मात्र यामुळे रेल्वे स्थानकापर्यंत जाणारी पायवाट अडविण्यात आली आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

कामोठे येथील नागरिकांनी मंगळवारी सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्याकडे याबाबत तक्रार केल्यानंतर तत्काळ सिडको भवनात बैठक बोलावण्यात आली.  यावेळी सिडको अधिकाऱ्यांनी खांदेश्वर स्थानकासमोरील परिसराची पाहणी करीत या समस्येवर पर्याय शोधू असे आश्वासन नागरिकांना दिले आहे.

सिडकोचा हा प्रकल्प विकासक कंपनीला पुढील चार वर्षांत पूर्ण करायचा आहे. तोपर्यंत मोठा वळसा घालून प्रवाशांना रेल्वे स्थानक गाठावे लागणार आहे. याखेरीज बसथांब्याच्या व वाहनतळासाठी आरक्षण हटवून सिडको मंडळाने थेट गृहनिर्माण प्रकल्प उभारल्याने घरासमोरील मोकळी जागा नाहीशी होणार असल्याचे दु:खही येथील नागरिकांना आहे.

खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोर कामोठे वसाहतीमधील सेक्टर २४, २५, २६, २७ व २८ हा परिसर वसलेला आहे. सिडकोच्या नियोजित आराखडय़ानुसार सेक्टर २४ ते २७ या परिसरातील नागरिकांना रेल्वे स्थानक गाठण्यासाठी ही पायवाट होती. ती सोमवारी विकासकाने बंद केली. विशेष म्हणजे याच मार्गालगत बसआगार आहे. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन मंडळाच्या बस याच आगारात उभ्या राहत असतात. मात्र, सोमवारपासून ही पायवाट बंद केल्याने येथील नागरिकांची अडचण होत आहे. यामुळे नागरिकांनी विकासक कंपनीच्या व्यवस्थापकाला जाब विचारल्यावर संबंधित व्यवस्थापकाने सिडकोशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांना केले.

स्वाक्षरी मोहीम

नागरिकांनी सिडको मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांचे या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. मानसरोवर स्थानकासमोरील वाहनतळ व खांदेश्वर रेल्वेस्थानकासमोरील बस आगाराचे थेट आराखडय़ातून बदल करताना नागरिकांना का विचारात घेतले नाही असा नागरिकांचा प्रश्न आहे.

पादचाऱ्यांची पायपीट

घरबांधणीचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर सेवा रस्ता येथे पादचाऱ्यांसाठी ठेवण्यात येईल असेही सांगण्यात येत आहे. खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोरील चार हेक्टर जागेवर सिडको अल्प उत्पन्न गटातील घरांची निर्मिती केली जात आहे. प्रकल्प उभारण्यासाठी नागरिकांचा विरोध नाही, मात्र चार वर्षे सामान्यांची वाट रोखल्याने पर्यायी मार्ग ठेवला नसल्याने अनेक पादचाऱ्यांची पायपीट वाढणार आहे.