ग्रामस्थांचा मोर्चा
पनवेल येथील वहाळ गाव हे ‘ना दारू क्षेत्र’ करण्याचा ठराव ग्रामसभेने मंजूर करूनही गावातील शाळेपासून २० मीटरच्या अंतरावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने साजन बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटला परवानगी दिली आहे. या निर्णयाविरोधात शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली वहाळ ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात मंगळवारी मोर्चा काढला. हा मोर्चा सेक्टर १९ येथून सुरू झाला. वहाळ व परिसर एनआरआय पोलीस ठाण्यात येत असल्याने तेथील पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी मोर्चा काढू नये यासाठी दबाव टाकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या मोर्चामध्ये सामील झालेल्या अनेक महिलांनी प्रशासनाच्या कारभाराप्रति संताप व्यक्त करत या बारची परवानगी कायम ठेवल्यास याहून मोठे आंदोलन करू, असा इशारा प्रशासनाला दिला.
वहाळ ग्रामपंचायतीने २६ जानेवारीच्या ग्रामसभेत पाच ठराव मंजूर केले, त्यापैकी गाव व परिसर ‘ना दारू क्षेत्र’ जाहीर करावे असा ठराव घेण्यात आला. या ठरावाची प्रत राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांना देण्यात आली. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने साजन बारला परमीट रूमचा परवाना दिला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने साजन बारला परवाना देताना हॉटेलच्या चतु:सीमेच्या आराखडय़ात शाळाच दाखविली नसल्याचा आरोप शेकापचे राजेंद्र पाटील यांनी केला आहे. उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी बार मालकाला परवाना मिळावा म्हणून जिल्हा परिषदेची २० मीटर अंतरावर असलेली शाळा गायब करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. राजेंद्र पाटील यांनी १५ डिसेंबरला उत्पादन शुल्क विभागाला दिलेल्या पत्रामध्ये या विषयावर मतदान घेण्याची लेखी मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न केल्याने ग्रामस्थांना रस्त्यावर उतरावे लागले.