सुपारी, मक्याच्या लाकडाची ताटे, चमचे बाजारात; दर मात्र सातपट

विविध घरगुती किंवा सार्वजनिक कार्यक्रम आणि मंगलकार्याचा अविभाज्य घटक असलेली प्लास्टिक किंवा थर्माकोलची ताटे, वाटय़ा, चमचे, ग्लास प्लास्टिकबंदीमुळे हद्दपार झाल्यामुळे पर्याय शोधण्याची धडपड सर्वत्र सुरू आहे. त्यातूनच लाकडी ताटांचा पर्याय पुढे आला असून एपीएमसीमध्ये ही ताटे उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती मात्र प्लास्टिक किंवा थर्माकोलच्या ताटांपेक्षा बऱ्याच जास्त असल्यामुळे त्यांना ग्राहक कितपत पसंती देतील हा प्रश्न उपस्थित होत आहे.

आजवर सुमारे १ रुपयाला एक अशा दरात प्लास्टिकची ताटे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ही सुमारे ७ ते ८ रुपयांना एक अशा दरात उपलब्ध असलेली लाकडी ताटे परवडणे कठीण आहे. लाकडाचे चमचे प्रती नग ३ रुपये दराने उपलब्ध आहेत. या वस्तू कागदी किंवा प्लास्टिकच्या वस्तूंपेक्षा टणक आहेत. पुनर्वापर करता येत नसून एकदा वापरून टाकून देता येणार आहे.

प्लास्टिकबंदी लागू झाल्यापासून एपीएमसीतील प्लॅस्टिकच्या वस्तूंची अनेक दुकाने बंदच ठेवण्यात आली आहेत. सुपारीच्या लाकडापासून तयार केलेली ताटे ८० रुपयांना १० तर मक्याच्या झाडापासून बनविलेली ताटे १८० रुपयांना २५ अशा दराने विकण्यात येत आहेत. त्यावर १८ टक्के वस्तू व सेवा करही मोजावा लागत आहे. लाकडी चमचे प्रतिनग ३ रुपयांना उपलब्ध आहेत.

राज्य सरकारने प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापरावर बंदी आणल्याने आता दक्षिण भारतातील पर्यायी लाकडी वस्तू उपलब्ध झाल्या आहेत. आधी देखील या वस्तूंचे उत्पादन केले जात होते. मात्र आता प्लास्टिक बंदीमुळे मागणी वाढत आहे.

जयप्रकाश पटेल, घाऊक विक्रेते