कामे शेवटच्या टप्प्यात; दोन वेळा हप्ते भरण्यास मुदतवाढ

नवी मुंबई : दोन वर्षांपूर्वी सिडकोने जाहीर केलेल्या महागृहनिर्मितीतील पंधरा हजार घरांच्या सोडतीतील सुमारे साडेतीन हजार घरांचा ताबा वर्षांअखेपर्यंत दिला जाणार आहे. या घरांचा ताबा ऑक्टोबरमध्ये देण्याचे आश्वासन सिडकोने यापूर्वी दिले होते. करोना साथीचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीत या घरांचे बांधकाम ठप्प झाले होते. आता काम सुरू असून काम शेवटच्या टप्प्यात आहे. टाळेबंदीमुळे विद्युत आणि इतर आवश्यक कामे शिल्लक आहेत.

केंद्र सरकारच्या सर्वासाठी घरे या योजनेअंर्तगत जास्तीत जास्त परवडणारी घरे बांधण्याची जबाबदारी सिडकोवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सिडकोने टप्प्याटप्प्याने दोन लाख घरे बांधण्याचे उदिष्ट नजरेसमोर ठेवले आहे. यातील १४ हजार ७३८ घरांची सोडत दोन वर्षांपूर्वी महात्मा गांधी जयंतीचे निमित्त साधून ऑक्टोबरमध्ये काढण्यात आली होती. या सोडतीत भाग्यवंत ठरलेल्या ग्राहकांचे तिमाही हप्ते घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागील दोन वर्षांत ग्राहकांनी बँक कर्ज घेऊन सोडतीत लागलेल्या घरांचे हप्ते भरणे सुरू ठेवले आहे. करोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत अनेक ग्राहकांचे रोजगार गेले आहेत तर काही जणांची वेतन कपात झाली आहे. त्यामुळे हे हप्ते भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. सिडकोने दोन वेळा ही मुदतवाढ दिली आहे. यात काही ग्राहकांनी मात्र सिडकोचे हप्ते सुरळीत भरलेले आहेत. तळोजा, खारघर, घणसोली या भागात बांधण्यात येणाऱ्या या योजनेतील काही घरे बांधून तयार झालेली आहेत. सिडकोच्या आश्वासनानुसार या घरांचे ताबे ऑक्टोबर २०२० मध्ये दिले जाणार होते, मात्र गेले पाच महिने लागू असलेल्या टाळेबंदीमुळे या घरांची शेवटच्या टप्प्यातील कामे अद्याप अपूर्ण आहेत. या घरांची स्थापत्य कामे जवळजवळ पूर्ण झाली असून विद्युत आणि इतर सुविधायुक्त कामे बाकी आहेत. टाळेबंदीच्या पाच महिन्यांत अनेक मजूर व कामगार हे गावी गेल्याने ही कामे करणाऱ्या कंत्राटदारांचा नाईलाज झालेला आहे. त्यामुळे शेवटचा हात फिरणारी ही घरातील कामे करण्यास आणखी चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सिडकोतील एका उच्च अधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्यामुळे या घरांचा येत्या ऑक्टोबपर्यंत ताबा देणे शक्य होणार नाही. हा ताबा आता वर्षांअखेपर्यंत दिला जाणार आहे.