मंत्रिपद पदरात पडावे यासाठी सिडकोचे अध्यक्ष व तिसऱ्यांदा मोठय़ा मतधिक्याने निवडून आलेले प्रशांत ठाकूर यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजप सरकारच्या पहिल्या सत्रात ही मोर्चेबांधणी अपयशी ठरल्याने मंत्री पदाऐवजी सिडकोच्या अध्यक्ष पदावर त्यांची बोळवण करण्यात आली होती. कोकणच्या प्रवेशद्वारावर असलेले पनवेल हे भविष्यातील आर्थिक क्षेत्र असून रायगड मध्ये भाजपा वाढीसाठी पालकमंत्री पद महत्वाचे असल्याने ही मोर्चेबांधणी दिल्लीपर्यंत करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूकीत भाजप कार्यकर्त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठा असलेला ठाणे जिल्हा सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खारघर मध्ये घेतलेली जाहीर सभा कोकणात पक्ष वाढीला प्राधान्य देणारी आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, न्हावा शेवा शिवडी सागरी सेतू, कॉर्पोरेट पार्क, नैना क्षेत्र, कोकण सागरी मार्ग, विस्तारीत रेल्वे यामुळे पनवेलला एक अन्यन्यसाधारण महत्व येणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी हे महत्व आपल्या भाषणात अधोरिखित केलेले आहे. या भविष्यातील आधुनिक शहराला आतापर्यंत मंत्री पदाची झालर लाभलेली नाही. एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी गेल्या निवडणूकीपासून भाजपकडे सुपूर्द केला आहे. प्रशांत ठाकूर या मतदार संघातून तीन वेळा आमदार झाले आहेत.  शीव-पनवेल महामार्गावरील टोल माफीवरून राजकारणाची दिशा ओळखून भाजपमध्ये उडी मारलेल्या ठाकूर यांनी भाजप सरकारच्या पहिल्या सत्रातही मंत्रिपदाची आस ठेवली होती, पण भाजपमध्ये नवीन असलेल्या ठाकूर कुटुंबियांचे हे प्रयत्न तोकडे पडले. पनवेल पालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत ठाकूर यांनी पालिकेवर एकहाती वर्चस्व सिध्द केल्यानंतर त्यांना मंत्री पदाऐवजी सिडकोचे बहुचर्चित अध्यक्षपद देण्यात आले.

प्रकल्पग्रस्त असलेल्या ठाकूर यांच्या दृष्टीने हे पद म्हणजे सुळावरची पोळी आहे. नवी मुंबई शहर प्रकल्पासाठी जमिन दिलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची तात्काळ सोडवणूक न केल्यास त्यांच्यात नाराजीची ठिणगी लगेच पडत असल्याचे दिसून आले आहे. आता पनवेल व उरण येथील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न जास्त आहेत. सिडकोचे अध्यक्ष पद असताना खारघरसारख्या शहरी भागातील नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविता येत नसल्याची खंत ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. पाण्यासाठी इतर प्राधिकरणांच्या कृपेवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे सिडकोच्या अध्यक्ष पदापेक्षा राज्याचे मंत्रिपद मिळावे यासाठी ठाकूर यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे समजते.

मंत्रिपदासाठी आग्रह का?

पंतप्रधान मोदी यांनी एकाच वर्षांत दोन वेळा पनवेलला भेट दिली आहे. भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विधानसभा निवडणूकी पूर्वी घेतलेल्या कोकण कार्यकर्ता बैठकीत कोकणात पक्ष वाढला पाहिजे आणि त्यासाठी काहीही करण्याची तयारी दर्शवली आहे. कोकणातील पेण, पनवेल आणि थेट कणकणवली मतदार संघ हे तीन मतदार संघ सध्या भाजपाकडे आले आहेत मात्र या तिन्ही मतदार संघात आयारामाच्या माध्यमातून भाजपा टिकला आहे. उरणच्या अपक्ष महेश बालदी यांनी भाजपला पांठिबा दिला आहे. त्यांना ठाकूर यांनी बळ दिले होते. शेकाप, काँग्रेस आणि भाजप असा प्रवास केलेल्या ठाकूर यांनी आता भाजपमध्येच कायम राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्य़ात पक्ष वाढीसाठी मंत्रीपद आवश्यक असल्याचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.