निर्बंध शिथिलीकरणानंतर नवी मुंबईत संख्या वाढली; २१३८ परवानाधारक फेरीवाले

नवी मुंबई : आधीपासूनच असलेली फेरीवाल्यांची समस्या करोना निर्बंध शिथिलीकरणानंतर आणखी गंभीर झाली आहे. नवी मुंबईत २१३८ इतकेच परवानाधारक फेरीवाले आहेत. मात्र शहरातील एका प्रभागातही यापेक्षा अधिक फेरीवाल्यांची संख्या  झाली आहे.  त्यांनी पदपथासह रस्त्यांवर ताबा घेतल्याने वाहतूक कोंडीसह सुरक्षा अंतराचा प्रश्न निर्माण होत आहे.

ठाणे महापालिकेतील एका महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्यांकडून नुकताच प्राणघातक हल्ला करण्यात आला. नवी मुंबईतही असे यापूर्वी अनेक प्रकार घडलेले आहेत. कोपरखैरणेतील एका फेरीवाल्याने कढईतील गरम तेल अंगावर टाकण्याचा प्रकार यापूर्वी घडला होता तसेच सीवूड्स विभागात पथकातील सुरक्षारक्षकाला मारहाण झाल्याची ताजी घटना आहे.

नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाले व पालिका अधिकाऱ्यांमाध्ये झालेल्या वादात अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला केल्याचा गंभीर प्रकारही घडला आहे. शहरातील आठही विभागांत मोठय़ा प्रमाणात बेकायदा फेरीवाल्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. महापालिकेचे फेरीवाला धोरण अद्याप पूर्णत्वास आले नसून शहरात फक्त २,१३८ परवानाधारक फेरीवाले आहेत. तर त्याच्या कित्येक पट बेकायदा फेरीवाले व्यवसाय करताना पाहायला मिळतात. सर्वच विभागात फेरीवाल्यांची संख्या वाढत आहेत.

काही ठिकाणी दुकानांत पोटभाडेकरूची संख्याही वाढत आहे. वाशी सेक्टर ९,१० परिसरातही फेरीवाल्यांची संख्या मोठी आहे. नेरुळ, सीवूड्स, वाशी कोपरखैरणेसह विविध विभागांत फेरीवाल्यांनी पदपथ व रस्त्यावर आपली दुकाने थाटली आहेत.  सामान्य नागरिकांना विचारणा केली दमदाटी होत असल्याच्या तक्रारीही आहेत. उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटपर्यंतच्या हद्दीत फेरीवाल्यांना बसण्यास मनाईचा निर्णय दिला आहे. असे असताना नवी मुंबईतील

रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसवले आहे. तसेच चौक, गर्दीची ठिकाणे अडवली जात आहेत. करोनानंतर महापालिकेने फेरीवाल्यांवर कारवाई केल्याची मोठी घटना एकिवात नाही. कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याने ही समस्या आणखी गंभीर होत चालली आहे. शहरात परवानाधारक फेरीवाल्यांची संख्या २१३८ आहे तर ७३२५ फेरीवाल्यांची नोंदणी फेरीवाला धोरणानुसार प्रक्रियेत असल्याची माहिती परवाना उपायुक्त श्रीराम पवार यांनी दिली.

नवी मुंबई शहरात बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येते. पालिकेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनाही मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कायदा हातात घेतल्यास पालिकेकडून नियमानुसार संबंधितावर कारवाई करण्यात येईल. विभाग अधिकाऱ्यांमार्फत बेकायदा फेरीवाल्यांबाबत कारवाई करण्यात येईल.

अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका