अखेर नवी मुंबई पालिकेला जाग; पेयजलाचा उद्यानांसाठी वापर बंद करण्याचा निर्णय

नवी मुंबई नवी मुंबईतील उद्यानांना मोरबे धरणातील पिण्याच्या पाण्याऐवजी मलनिस्सारण केंद्रातील प्रक्रियायुक्त पाणी देण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी पाठण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात नेरुळमधील ३० उद्यानांना ५ एमएलडी पिण्याच्या पाण्याऐवजी नेरुळ सेक्टर ५० येथील मलनिस्सारण केंद्रातून प्रक्रियायुक्त पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे १५ एमएलडी पिण्याच्या पाण्याची बचत होणार आहे.

नवी मुंबईतील सांडपाण्यावर मलनिस्सारण प्रकल्पांत (एसटीपी) प्रक्रिया करून ते समुद्रात सोडले जाते. कोटय़वधी रुपये खर्च करून प्रक्रिया केलेले वापरायोग्य पाणी समुद्रात सोडण्यावरून महापालिकेवर नेहमीच टीका केली जाते. आता हे प्रक्रियायुक्त पाणी वापरण्याचा निर्धार पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. व अतिरिक्त आयुक्त मोहन डगावकर यांनी केला आहे. पहिल्या टप्प्यात नेरुळमधील ३० उद्यानांना ५ एमएलडी पिण्याच्या पाण्याऐवजी नेरुळ सेक्टर ५० येथील मलनिस्सारण केंद्रातून प्रक्रियायुक्त पाणी दिले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात सर्व प्रकल्प कार्यरत झाल्यानंतर शहरात १५ एमएलडी पिण्याच्या पाण्याची बचत होणार आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

नवी मुंबई महापालिकेने शहरात ३९५ कोटी रुपये खर्च करून सहा अत्याधुनिक एसटीपी उभारले आहेत. त्यात रोज १८५ ते २२० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. या पाण्याची विक्री करून पालिकेला उत्पन्न मिळेल, अशी सुरुवातीला अपेक्षा होती, मात्र हे पाणी घेण्यास कोणीही तयार नव्हते. पालिकेने कंपन्यांना हे पाणी वापरणे बंधनकारक करणे अपेक्षित आहे. महपालिकाही अमृत योजनेअंतर्गत हे प्रक्रियायुक्त पाणी एमआयडीसीला देण्याची प्रक्रिया करत असताना पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या पुढाकाराने आता उद्यानांसाठी मलनिस्सारण केंद्रातील पाण्याचा वापर केला जाणार आहे.

आबासाहेब जऱ्हाड यांच्या आयुक्तपदाच्या कार्यकाळात हे प्रक्रियायुक्त पाणी एनआरआय कॉम्प्लेक्स फेज दोनमधील सोसायटय़ा घेत होत्या. ६९२ सदनिका व दोन हजार लोकवस्ती असलेली ही सोसायटी उद्यानासाठी, साफसफाईसाठी व वाहने धुण्यासाठी हे पाणी वापरत होती. त्याच धर्तीवर आता नेरुळमध्ये १३ किमीची वाहिनी टाकून प्रक्रियायुक्त सांडपाणी उद्यानांत सोडले जाणार आहे. एसटीपीमध्येच भूमिगत उदंचन टाक्या बांधण्यात येणार आहेत. नेरुळमधील वंडर्स पार्क, रॉक गार्डन, ज्वेल ऑफ नवी मुंबईसह ३० उद्यानांत, तसेच दुभाजकांवरील हिरवळीसाठी या पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे.

शहरातील उद्यानांसाठी पिण्याचे पाणी देण्याऐवजी प्रक्रिया केलेले पाणी देण्यात येईल. त्यामुळे शहरातील १५ एमएलडी पिण्याच्या पाण्याची बचत होणार आहे. प्रथम नेरुळ विभागातील ३० उद्यानांना व दुभाजकावरील हिरवळीसाठी वाहिनीद्वारे हे पाणी देण्याचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी बनविण्यात आला असून त्यातून ५ एमएलडी पाण्याची बचत होईल.त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहरातील सर्वच उद्यांनाना एसटीपीचे प्रक्रियायुक्त पाणी देण्याचे प्रस्तावित आहे.

– डॉ. रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महापालिका

सांडपाणी प्रक्रिया

३९५ कोटी रुपये केंद्र निर्मिती खर्च

१६ कोटी रुपये वर्षभरातील प्रक्रिया खर्च

१३ किमी प्रक्रियायुक्त पाण्यासाठीची वाहिनी

१० कोटी रुपये पुनर्वापरासाठी अपेक्षित खर्च

०५  एमएलडी नेरुळमधील पाण्याचा पुनर्वापर