नोटाबंदी, रेरा, जीएसटीचा मालमत्ता प्रदर्शनाला फटका

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या नवी मुंबई बिल्डर असोसिएशन मालमत्ता प्रदर्शन केंद्रात चार दिवस बघे जास्त आणि ग्राहक कमी अशी स्थिती होती. गेली अनेक वर्षे हजार-दोन हजार कोटी रुपयांच्या घरविक्रीचे आकडे सांगणारे विकासक या वेळी मात्र चिडीचूप होते. कोटय़वधी रुपये खर्च करून आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात असोसिएशनचे पदाधिकारीच जास्त दिसून आले. नोटाबंदीचा अद्याप शिल्लक असलेला परिणाम, जीएसटीबद्दलची अनिश्चितता आणि महारेरामुळे घर विक्रीचे कठीण झालेले कसब यामुळे यंदाचे मालमत्ता प्रदर्शन ‘थोडी खुशी ज्यादा गम’ या पठडीतले होते.

वांद्रे येथील बीकेसीच्या मैदानात भरणारे भव्य मालमत्ता प्रदर्शन हे घर अथवा वाणिज्य मालमत्ता खरेदी करणाऱ्यासाठी पर्वणी मानली जाते. त्यानंतर डिसेंबर जानेवारीत नवी मुंबईतील सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात भरणारे मालमत्ता प्रदर्शन अनेकांना आकर्षित करते. बंदिस्त वातानुकूलित केंद्र आणि वाहनतळाची विस्तीर्ण व्यवस्था यामुळे या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांची संख्याही दरवर्षी वाढत असल्याचा अनुभव आहे. या प्रदर्शनाला चार-पाच लाख ग्राहक भेट देतील आणि एक-दोन हजार कोटींचा व्यवसाय होईल, अशी अपेक्षा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना असते. मात्र यंदा २६ जानेवारीपासून चार दिवस आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात किती धंदा होईल आणि किती ग्राहक येतील याचा अंदाज आयोजकांना बांधता आला नाही.

अभिनेत्री करिष्मा कपूरच्या हस्ते १८ व्या प्रदर्शनाचे उद्घाटन आटपून घेण्यात आले. प्रदर्शनात एकूण २५० प्रकल्प ८२ विकासकांनी विक्रीसाठी मांडले होते. त्यात दोन विकासक वगळता इतरांचा फारसा व्यवसाय झाला नाही, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. यातील एक स्टॉल हा एका प्रसिद्ध कंपनीच्या नावाने रियल इस्टेट क्षेत्रात प्रवेश केलेल्यांचा होता. काही बडय़ा उद्योजकांच्या रांगेत ही कंपनीदेखील बांधकाम व्यवसायात उतरल्याचे दिसून आले. या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ‘साई वर्ल्ड सिटी’ने यंदा साधा स्टॉल लावला होता. यापूर्वी हे बांधकाम व्यवसायिक जगातील काही आकर्षणांच्या प्रतिकृती तयार करत. या वेळी चार बडय़ा बांधकाम व्यावसायिकांनी या प्रदर्शन केंद्रातून अंग काढून घेतले होते. नोटाबंदीचा परिणाम अजून जाणवत असून ग्राहक घर खरेदी करताना दहा वेळा विचार करीत असल्याचे एका विकासकाने सांगितले. जीएसटीचा दर काय लावावा याबाबत संभ्रम असून काही विकासक तो १२ टक्के तर काही विकासक सात टक्के लावत आहेत. त्यामुळे घराच्या किमतीत वाढ होत आहे.

चार दिवसांच्या या मालमत्ता प्रदर्शनाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे, मात्र त्यातून किती जणांनी घर आरक्षित केले याची माहिती सांगता येणार नाही. विकासक आशावादी आहेत.

हरीश छेडा, अध्यक्ष, नवी मुंबई बिल्डर्स असोसिएशन, नवी मुंबई