घाऊक बाजारात तूरडाळ ९५ तर मूगडाळ १०५ रुपये किलो

नवी मुंबई</strong> : पालेभाज्या, कांदा, बटाटा यासह आता डाळींच्या दरातही वाढ होत आहे. एपीएमसीच्या घाऊक बाजारात तूरडाळ ९५ तर मूगडाळ १०५ रुपये किलोचे दर झाले आहेत. टाळेबंदी व अतिवृष्टी यामुळे घाऊक बाजारात किलोमागे दहा टक्के दरात वाढ झाली आहे.

तीन ते चार वर्षांपूर्वी डाळींच्या दरात मोठी वाढ झाली होती. गेल्या वर्षी यात काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र गेल्या वर्षी डाळींचे उत्पादन घटले आहे. त्यात करोनाचे संकट आल्याने टाळेबंदीत आवक घटली. तर काही दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली. यामुळे डाळीची आवक ५० टक्केने घटली आहे. परिणाम गेल्या महिन्यापासून डाळींच्या दरात वाढ होत आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथून मुख्यत्वे वाशीच्या कृषी उत्पन्न बाजारात डाळींची आवक होते. घाऊक बाजारात डाळींचे दर किलोमागे १० ते १२ रुपयांनी वाढले आहेत. ८० ते ८५ रुपये किलो असलेली तूरडाळ ९० ते ९५ रुपये तर मूगडाळ ९५ रुपयांवरून आता १०५ रुपयांवर पोहोचली आहे. चणाडाळ ५८ रुपयांवरून ६० ते ६५ रुपये किलो आहे.

करोना, टाळेबंदी आणि आता पावसामुळे बाजारात डाळींची आवक ५० टक्के कमी होत आहे. त्यामुळे घाऊक बाजारात डाळींच्या किमती १० टक्के वाढल्या आहेत. पुढील ८ ते १० दिवसांनी पुन्हा डाळींच्या किमती स्थिर राहतील.

 – नीलेश वीरा, संचालक, धान्य बाजार समिती

डाळींची आवक (क्विंटलमध्ये)

ऑगस्ट        २०१९           २०२०

चणाडाळ       २३८४९         १५६५३

तूरडाळ        ५६२४९        ३९८७१

मूगडाळ        ३२२९५         १९०५७

सप्टेंबर        २०१९            २०२०

चणाडाळ       १५१०७         १४३७६

तूरडाळ         ५०४३३        ४५८१५

मूगडाळ        २४८९७         २०७५७