पनवेल महापालिका शाळांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

पनवेल : पनवेल नगरपालिका असताना पालिकेच्या शाळांतील २१०० हून अधिक असलेली विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मुळात महापालिका झाल्यानंतर पटसंख्या वाढून शाळांचा दर्जा वाढवा अशी अपेक्षा होती. पटसंख्या वाढीसाठी पालिकेने पौष्टिक भोजनाची योजना हाती घेतली आहे तर शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी इंग्रजी शिक्षण शिशू वर्गापासून सुरू करण्याचा पालिकेचा मानस आहे.

पनवेल महापालिकेच्या १० शाळांमध्ये सध्या १९४० विद्यार्थ्यांची पटसंख्या असून ७४ शिक्षक विद्यादान करीत आहेत. छाकटा खांदा येथील एका विद्यालयात ३५० विद्यार्थी आहेत तर उर्दू शाळेत ४० विद्यार्थ्यांना दोन शिक्षक शिकवतात.

पनवेल शहरातील पहिली ते सातवी मराठी माध्यमांचे किती विद्यार्थी आहेत याची माहिती पनवेल पालिकेच्या शिक्षण विभागाकडे नाही. अशी यादी ठेवण्याची आवश्यकता या विभागाला वाटत नाही. पालिकेच्या शाळांना आयएसओ नामांकनाचा दर्जा मिळाला, याबाबत शिक्षण विभागाचे खुद्द अधिकारी अनभिज्ञ आहेत. घसरलेल्या शैक्षणिक दर्जामुळे नामांकन प्रमाणपत्राची वैध मुदत संपूनही कागदोपत्री पालिकेच्या शाळांना आयएसओ नामांकन जपता आले नाही.

दरम्यानच्या काळात पालिकेतील शिक्षिका व अधिकारी यांच्या गैरवर्तनाचा मुद्दा मुलांच्या शिक्षणापेक्षाही गाजल्याने पालिका विद्यालयातील विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी असल्याची स्थिती आहे.

सेमी इंग्रजीचे शिक्षण पाचवी व सातवी इयत्तेपर्यंत सुरू आहे, मात्र त्याचा प्रत्यक्ष लाभ बोटावर मोजक्या विद्यार्थ्यांना होत आहे. पालिकेच्या विद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे ६० टक्के विद्यार्थी अमराठी आहेत त्यांना मराठी शिक्षण मराठी भाषेतून दिले जाते. उरलेले ७४ शिक्षक अतिरीक्त ठरू नयेत म्हणून अमराठी विद्यार्थ्यांचा पट जपण्याची कसरत केली जात असल्याचे बोलले जात आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडून पालिकेच्या शाळेंचा स्तर सुधारण्यासाठी प्रयत्न आहे. मध्यान्ह भोजनासाठी पालिका क्षेत्रातील १० हजार विद्यार्थ्यांना पालिका पौष्टीक भोजनासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. जून महिन्यापासून हे भोजन पालिका क्षेत्रातील जिल्हापरिषदेच्या शाळेतील विद्यार्थी व पालिका विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

अक्षरपात्र या संस्थेसोबत करार करून पालिकेने पनवेल शहरातील साईनगर परिसरात सुमारे २० गुंठे जागा अक्षरपात्र संस्थेला शास्त्रोक्तपद्धतीचे स्वयंपाकगृह सुरू करण्यासाठी दिले आहे. या संस्थेने स्वत: खर्च करून तेथे भव्य स्वयंपाकगृहासाठी इमारत बांधली आहे.

इंग्रजी भाषेचे धडे

पालिका शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी पालिका पुढील शैक्षणिक वर्षांत मराठी भाषेसोबत इंग्रजी भाषेचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहोत. लवकरच त्याबद्दल निर्णय घेतला जाईल, असे पनवेल पालिकेचे  अतिरिक्त आयुक्तडॉ. प्रशांत रसाळ यांनी सांगितले.

पहिलीपासून विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षण देता यावे, यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रशासन व पालिकेच्या शाळांमध्ये सध्या शिकविणाऱ्या शिक्षकांमध्ये बैठक झाली आहे. पुढील शैक्षणिक वर्षांत इंग्रजी शिक्षण दिले जाईल. मात्र त्यासाठी पालिका क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे समावेशन झाल्यानंतर कोणत्या इमारतींमध्ये या शाळा भरवायचा हा महत्त्वाचा निर्णय होऊ शकेल. जिल्हा परिषदेच्या सुमारे ५१ शाळांमधील विद्यार्थ्यांनाही याचा लाभ व्हावा अशीच पालिकेची मनीषा आहे.

– डॉ. कविता चौतमोल, महापौर, पनवेल पालिका