उरण नगरपालिकेचा राजीव गांधी टाऊन हॉल सध्या धोकादायक स्थितीत आहे. मंगळवारी हा हॉल बंद करून पर्यायी जागा शोधा, असे सांगण्याची वेळ या इमारतीतील वाचनालयात येणाऱ्या लोकांवर आली. पहिल्या मजल्यावर डॉल्बीच्या दणदणाटाने खिडकी कोसळली आणि अनेकांच्या उरात धडकी भरली. या प्रकरणी उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद डवले यांनी घटनेची दखल घेत उपाययोजना करणार असल्याची माहिती दिली.
हॉलचे स्लॅब ठिकठिकाणी कमकुवत झाले आहेत. ते कधीही कोसळण्याची शक्यता आहे. तरीही हॉलमधील टिळक सभागृहात मंगळवारी डॉल्बीच्या आवाजात काही तरुण नृत्य करीत होते. संगीताच्या दणदणाटाने पहिल्या मजल्यावरील खिडकी कोसळली. त्यामुळे तळमजल्यावरील वाचनालयातील लोक घाबरून बाहेर पळाले.
सध्या उरण तालुका आणि शहरात मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी टाऊन हॉल हे एकच ठिकाण उपलब्ध आहे. १७ वर्षांपूर्वी नगरपालिकेने उरण मोरा रस्त्यालगत राजीव गांधी टाऊन हॉल उभारला. यात गॅलरीसह ९५० आसनाची व्यवस्था असलेले सभागृह आहे, तर तळमजल्यावर वाचनालय आहे.
मध्यंतरी सभागृहाचे स्लॅब कोसळले होते. त्यामुळे धोकादायक ठरू पाहणारे सभागृह बंद करून नवी इमारत उभारण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे नगरपालिकेने इमारत पाडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याजागी नवी व्यावसायिक स्वरूपाची इमारत आणि त्यात सभागृहाची सोय केली जाणार आहे; तरीही सध्या कार्यक्रमांसाठी टाऊन हॉलच पर्याय ठरला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2016 5:17 am