पालिका आयुक्तांचे अभियंता विभागाला निर्देश

नवी मुंबई</strong> : इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबईत खड्डे कमी आहेत, हे मान्य असले तरी खड्डे का पडलेत, असा सवाल करीत तत्काळ खड्डे दुरुस्त व्हायला हवेत, अशा सूचना पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अभियंता विभागाला दिल्या.

पालिका आयुक्तपदी अभिजीत बांगर यांची नियुक्ती करोनाकाळात झाली. त्यामुळे पदभार घेतल्यापासून ते करोनासाठी उपाययोजनांवर लक्ष दिले होते. आता हळूहळू ते इतर कामांबाबत आढावा घेत आहेत. नुकतीच आरोग्य विभागाची बैठक घेत त्यांनी आरोग्य सुधारणांबाबत निर्देश दिले आहेत. बुधवारी त्यांनी अभियंता विभागाची बैठक घेतली. यात नागरिकांना चांगल्या सुविधा पुरविणे, हा पालिकेचा प्रमुख उद्देश आहे. त्या दृष्टीने चांगले व दर्जेदार काम करावे. कामांच्या गुणवत्तेबाबत हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. शहरात अभियंता विभागामध्ये मोठय़ा प्रमाणात कामे केली जातात. पालिकेच्या कामाबाबत नागरिकांना तक्रार करण्याची वेळच येऊ  देऊ  नये अशा प्रकारे काम करावे. तक्रार आलीच तर जलदगतीने निराकरण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शहरात रस्ते, इतर स्थापत्यकामे, विद्युत, पाणीपुरवठा, मलनिस्सारण अशा विविध कामांचा आढावा आयुक्तांनी घेतला. पावसाचे प्रमाण कमी झाले असून येत्या आठवडय़ाभरात शहरातील रस्त्यांवर खड्डा दिसणार नाही अशा प्रकारचे काम करून घ्या, असे कार्यकारी अभियंता यांना त्यांनी निर्देश दिले. यापुढील काळात पूर्वसूचना न देता कामाची पाहणी करणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

मुख्यालयात विनाकारण थांबू नये!

अभियंत्यांनी विनाकारण मुख्यालयात थांबू नये. कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांनी कामाच्या ठिकाणी असणे गरजेचे आहे. आपण नागरिकांशी बांधील असून त्यांच्यासाठी जास्तीत जास्त उपलब्ध असले पाहिजे. तक्रारींचे तत्परतेने निराकरण झाले पाहिजे. कामाच्या दर्जाबाबत कोणतीही सबब खपवून घेतली जाणार नाही, असे या वेळी पालिका आयुक्तांनी सांगितले.