ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा येथील रस्ता रुंदीकरणाचे रखडलेले काम सुरू झाले. हा मार्ग सहापदरी करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात येथील वाहतूक कोंडीची समस्या संपुष्टात येणार आहे.

रस्ता रुंदीकरणात आड येणाऱ्या दुकानांचे इतरत्र पुनर्वसन करण्याच्या कामामुळे रस्ता वाढविता येत नव्हता. सोमवारी नवी मुंबई महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या कामाची गती वाढविण्याचे आदेश संबंधित विभागांना दिल्यानंतर पालिका प्रशासनाने सोमवारी रुंदीकरणात आड येणाऱ्या दुकाने तोडण्यास सुरुवात केली जाईल, अशी नोटीस बजावली होती; परंतु दुकानदारांनी स्वत:हून दुकानांचे गाळे रिकामी केले. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने दुकानांची बांधकामे पाडण्यात आली.

रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या दुकानदारांसाठी पालिकेने गाळे बांधले आहेत. त्यांचे या गाळ्यांमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे. रुंदीकरणाचे काम रखडल्याने वाशी आणि ठाण्याकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची मोठय़ा प्रमाणावर कोंडी होत होती. गेल्या चार वर्षांत अपघातात पाच ते सहांचा बळी गेला आहे.

यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता रस्ता रुंदीकरणामध्ये अडथळा ठरणाऱ्या गाळेधारकांना गाळे खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्याुनसार गाळेधारकांनी स्वताहून गाळे खाली करत जमिनदोस्त केले आहे. ज्या गाळेधाराकांने गाळे खाली केले नाही त्यावर पालिका कारवाई करणार आहे. तर रस्ता रुदंीकरणाचे काम सुरु झाले असून बांधित होणाऱ्या गाळे धारकांचा सर्वसाधारण सभेत निर्णय घेऊन पुर्नवसन करण्यात येणार आहे.