पालिकेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला कंत्राटदारांकडून अल्प प्रतिसाद

नेरुळ येथील वंडर पार्क परिसरात उभारण्यात येणाऱ्या विज्ञान केंद्राच्या ११० कोटी रुपये खर्चाच्या कामासाठी पालिकेला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा निविदा काढावी लागणार आहे. यापूर्वी काढण्यात आलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने ही निविदा दुसऱ्यांदा काढली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड पालिकेतील विज्ञान केंद्राच्या धर्तीवर पालिका वंडर पार्कमध्ये आयटी क्षेत्रावर आधारित विज्ञान केंद्र बांधणार असून या परिसरात एक वस्तुसंग्रहालयदेखील उभारणार आहेत. पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी यांचा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

पुण्यानंतर नवी मुंबईला शैक्षणिक पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे, पण या शहरात नैसर्गिक अथवा कृत्रिम पर्यटन स्थळ नाही. त्यामुळे पालिकेने सिडकोकडून वेगळा भूखंड न मागता नेरुळ सेक्टर १९ मधील वंडर पार्क मधील मोकळ्या जागेचा वापर करून एक विज्ञान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. वंडर पार्कची संपूर्ण जागा ही दहा हेक्टर असून यातील साडेसात हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर हे विज्ञान केंद्र बांधले जाणार आहे. ७२ कोटी स्थापत्य व इतर चाळीस कोटी रुपये खर्च असे एकूण ११० कोटी रुपये खर्चाच्या या विज्ञान केंद्राची लोकसभा निवडणुकीपूर्वी निविदा काढण्यात आली होती पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता निवडणूक निकालानंतर ही फेरनिविदा काढली जाणार आहे. त्याला देशातील कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून पुढील एक महिना निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवडय़ात या विज्ञान केंद्राच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होण्याची शक्यता आहे. या केंद्रासाठी सिडकोकडून दोन वाढीव एफएसआय मागितला आहे, पण मंजुरी मिळालेली नाही. या मंजुरीची वाट न पाहता पालिका कामाल सुरुवात करणार आहे. परिसरात एक वस्तुसंग्रहालय उभारले जाणार असून त्यात जगातील अनमोल वस्तू प्र्दशनासाठी ठेवल्या जाणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर नेरुळ येथील विज्ञान पार्कच्या कामाची फेरनिविदा काढली जाणार आहे. चाळीस दिवसांच्या निविदा प्रक्रिया कालावधी नंतर या कामाला लागलीच सुरुवात करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

– सुरेंद्र पाटील, शहर अभियंता, नवी मुंबई पालिका