रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर दिल्याने लागण कमी

नवी मुंबई</strong> : पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांची लागण लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. करोनाकाळात आरोग्याबाबत कमालीच्या दक्ष झालेल्या नागरिकांनी प्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर दिला आहे. याशिवाय स्वच्छता आणि उघडय़ावरील खाणे बंद केल्याने गतवर्षीच्या तुलनेत साथीच्या रुग्णांत घट झाल्याचे चित्र आहे.

पावसाळ्यत गॅस्ट्रो, अतिसार आणि लेप्टोस्पायरोसिस हे साथीचे आजार डोके वर काढतात. याशिवाय मलेरिया, डेंग्यू यांसारखे कीटकजन्य आजारही वाढतात. यंदा या आजारांमध्ये मोठय़ा प्रमाणात घट झाल्याचे चित्र आहे. करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न सुरू असताना अन्य साथीच्या आजारांच्या रुग्णांचा आकडा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.

करोनाकाळात नागरिकांनी घेतलेल्या खबरदारीमुळे शहरातील इतर साथींच्या आजारात घट झाल्याचे जाणवत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

करोना संक्रमणात वाढ होऊ नये, यासाठी शासकीय स्तरावर सूचना देण्यात आल्या आहेत. यात मुखपट्टय़ांचा उपयोग, वारंवार हातांची स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छता पाळण्यात आली. याशिवाय रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारावर भर दिल्याने तसेच आर्सेनिक अल्बम गोळ्या, व्हिटॅमिन गोळ्या आणि विविध आयुर्वेदिक काढे घेण्याचे सल्ले देण्यात आले. टाळेबंदीत नागरिकांनी अंतराच्या नियमाचे पालन केल्याने प्रतिकार शक्ती वाढण्यास साह्य़ झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

साथनामा

साथ                                 २०१९      २०२०

*   गॅस्ट्रो                            ४०          १८

* कॉलरा                           ०८            ०१

* हेपाटायटिस                   ०९            ००

* विषमज्वर                     ३९            ०१

* मलेरिया                        १०            ०७

* डेंग्यू (संशयित)              २४           ०२

* डेंग्यू                               ०२            ०१