सीवुड्स रेल्वे स्थानक परिसरात ढिगारे

सी-वूड्स रेल्वेस्थानक परिसरात मोठय़ा प्रमाणात डेब्रिज टाकण्यात आले आहे. पालिका क्षेत्रात परवानगी न घेता डेब्रिज टाकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी डेब्रिजविरोधी भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे, मात्र या पथकाचे सी-वूड्स येथील डेब्रिजकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.

नवी मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या वाशी व ऐरोली पुलावरून डेब्रिज भरलेल्या अनेक गाडय़ा येताना दिसतात. हे डेब्रिज कुठे टाकले जाते, त्यासाठी पालिकेची परवानगी घेतलेली असते का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सी-वूड् रेल्वेस्थानकाजवळच्या सेक्टर २५ येथे रेल्वेमार्गाजवळ मोठय़ा प्रमाणात डेब्रिज टाकण्यात येत आहे. ढिगारे साचले असताना पालिकेच्या डेब्रिजविरोधी भरारी पथकाला मात्र याचा पत्ताच नाही. सी-वूड्स रेल्वेस्थानकाच्या पूर्वेला अशाच प्रकारे मोठय़ा प्रमाणात डेब्रिज टाकण्यात आले आहे. डेब्रिज टाकून ते सपाट करून नंतर त्यावर बेकायदा झोपडय़ा वसवल्या जातात. त्यामुळे सी-वूड् विभागासह शहरात बेकायदा डेब्रिज टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

शहरात दोन डेब्रिजविरोधी भरारी पथके आहेत. वाशी व ऐरोली विभाग कार्यालयाअंतर्गत व पालिकेच्या घनकचरा विभागामार्फत त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात येते, परंतु शहरात डेब्रिजचे ढिगारे पडत असताना भरारी पथक कोठे असते, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

दोन भरारी पथकांसाठी दोन वाहने, कर्मचारी, सुरक्षारक्षक असतात. असे असूनही शहरात डेब्रिज साचत असल्यामुळे पथकाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ‘सी-वूड्स’ परिसरात रेल्वे स्थानक आणि ‘एल अ‍ॅन्ड टी’ कंपनीचे काम सुरू आहे. त्यामुळे या परिसरात डेब्रिज कोण टाकतात, याचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

प्रत्येक गाडीचे एक हजार

डेब्रिजच्या प्रत्येक गाडीकडून पालिका एक हजार रुपये वसूल करते. अंधाराचा फायदा घेत काही वाहने डेब्रिज विनापरवाना टाकतात. त्यांच्याकडून पालिका दंड वसूल करते. हे वाहतूकदार काही वेळा रस्त्याच्या कडेला डेब्रिज टाकून पसार होतात.

सीवूड येथे टाकलेल्या डेब्रिज बाबत तपासणी करुन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.तसेच शहरात बेकायदेशीरपणे टाकण्यात येत असलेल्या डेब्रिज बाबत भरारीपथकाला जाब विचारण्यात येईल.   – तुषार पवार, उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन