‘एसएफआय’चा आंदोलनाचा इशारा

ठाणे जिल्ह्य़ातील बेलापूर पट्टीतील विकास झाल्याचे कारण पुढे करीत स्थानिक भूमिपुत्रांच्या वारसांना शिक्षणासाठी देण्यात येणारे विद्यावेतन सिडकोकडून बंद करण्यात आले आहे. यानंतर उरण आणि पनवेल परिसरातील विद्यार्थ्यांचेही विद्यावेतन बंद करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे सूचित करण्यात आले आहे. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात ‘एसएफआय’ या विद्यार्थी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सिडकोने नवी मुंबईसाठी राहती घरे वगळता संपूर्ण जमिनी संपादित करून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याची देशात पहिलीच घटना आहे. त्यामुळे येथील स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्या पुनर्वसनासाठी रक्तरंजित संघर्षही केला. त्यात पाच शेतकऱ्यांनी हौतात्म्यही पत्करले. त्याबदल्यात १९७५ पासून सिडकोने ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत अशा शेतकऱ्यांच्या वारसांना ११ वीपासून पदवी, पदव्युत्तर तसेच आयटीआय शिक्षणासाठी विद्यावेतन सुरू केले होते. १९९० साली अशाच प्रकारे सिडकोने विद्यावेतन बंद करण्याचा घाट घातला होता. याविरोधात एसएफआय या विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वात निघालेला मोर्चा आणि त्यानंतरच्या घेराव आंदोलनात सिडकोने नातू, पुतण्या व सून या वारसांना विद्यावेतन व नोकरीचा हक्क देण्याचे मान्य केले होते. तसेच अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही विद्यावेतन सुरू केल्याची माहिती एसएफआयचे निमंत्रक भास्कर पाटील यांनी दिली, तर दुसरीकडे सध्या सिडकोमध्ये मोठय़ा प्रमाणात विविध पदांसाठी नोकरभरती होत असताना अभियांत्रिकी, कारकून तसेच साध्या शिपाई पदासाठीही प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य दिले जात नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.