तिजोरीच्या चाव्या युतीकडे; राष्ट्रवादीला कंटाळलेल्या काँग्रेसचा शिवसेनेला हात
गतवर्षी झालेल्या पालिका निवडणुकीत काठावर पास झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्थायी समिती निवडणुकीत जबरदस्त धक्का बसला असून काँग्रेसच्या एका सदस्याने शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केल्याने पालिकेच्या तिजोरीच्या चाव्या शिवसेना-भाजप युतीकडे गेल्या आहेत. त्यामुळे पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची सद्दी संपली असून काँग्रेसच्या पािठब्यावर झालेले अपक्ष उमेदवार महापौर तर शिवसेनेचा उमेदवार स्थायी समिती सभापती असे चित्र निर्माण झाले आहे. माजी मंत्री गणेश नाईक यांना स्वत:च्या पराजयानंतर हा दुसरा राजकीय धक्का मानला जात आहे.
नवी मुंबई पालिकेत एकूण १११ नगरसेवक असून १६ सदस्यांची स्थायी समिती आहे. दरवर्षीप्रमाणे मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात स्थायी समिती सभापती निवडणूक घेतली जात असून एप्रिल महिन्यात समितीतील आठ सदस्य निवृत होऊन त्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती केली जाते. त्यानुसार राष्ट्रवादीने आपल्या चार सदस्यांपैकी दिघा येथील नगरसेविका अर्पणा गवते नियुक्ती केली होती पण त्यांच्या नगरसेवकपदावर टांगती तलवार असल्याने आठवडय़ापूर्वी त्यांचा राजीनामा घेण्यात आला होता. त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोमवारी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. त्याची माहिती सर्व नगरसेवकांना केवळ ४८ तासांपूर्वी देण्यात आली होती. त्याला शिवसेना-भाजप सदस्यांनी आक्षेप घेतला. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार नगरविकास विभागाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमच्या कलम ४५१ अन्वेय या सर्वसाधारण सभेला स्थगिती देण्यात आली. नगरविकास विभागाची ही स्थगिती जुगारून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोमवारी सकाळी दहा वाजता विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते. त्याला विरोधी पक्षनेते विजय चौगुले, नामदेव भगत, किशोर पाटकर या शिवसेनेच्या नगरसेवकांना आक्षेप घेतला. मुख्यमंत्र्यांनी विशेष सर्वसाधारण सभेला स्थागिती दिली असताना ही सभा कशी घेण्यात आली, असा या सदस्यांचा सवाल होता. सदस्यांच्या या आक्षेपाला न जुमानता महापौर सुधाकर सोनावणे यांनी विशेष सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू केले. या सभेत अर्पणा गवते यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश मोरे यांची निवड जाहीर करण्यात आली. त्यामुळे सभागृहात विरोधकांनी एकच गोंधळ घातला. महापौरांनी ही सभा गुंडाळल्यानंतर बारा वाजता स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. त्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले ह्य़ा पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार होत्या. दोन तासांपूर्वी निवड जाहीर झालेल्या प्रकाश मोरे यांच्या स्थायी समिती सदस्यपदावर शिवसेनेचे सदस्य एम. के. मढवी व शिवराम पाटील यांनी आक्षेप घेतला. मोरे यांना स्थायी समिती पदाच्या निवडणुकीची तीन दिवस अगोदर विषयपत्रिकाच मिळाली नसल्याने त्यांना या निवडणुकीत मतदान करता येणार नाही, असा निर्वाळा पीठासीन अधिकारी शीतल उगले यांनी दिल्याने मोरे यांना स्थायी समिती निवडणुकीत भाग घेता आला नाही. स्थायी समिती सभापतीपदासाठी तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या जयवंत सुतार यांनी तर शिवसेनेकडून शिवराम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यात भाजपच्या दीपक पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सुतार व पाटील यांच्यात सरळ लढत होऊन पाटील यांना १५ सदस्यांपैकी आठ मते मिळाल्याने ते विजयी घोषित करण्यात आले. यात काँग्रेसच्या नेरुळ येथील नगरसेविका मीरा पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवारी शिवराम पाटील यांना मतदान केल्याने त्यांना आठ मते मिळाली तर सुतार यांना त्यांच्या पक्षाची सात प्राप्त झाली. पालिकेत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी असून उपमहापौरपद काँग्रेसकडे आहे. शिवसेनेच्या या विजयामुळे पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सत्तेला मोठा धक्का बसला असून सध्या काँग्रेसच्या पािठब्यावर अपक्ष सुधाकर सोनावणे हे महापौर आहेत तर शिवसेनेच्या ताब्यात तिजोरीच्या चाव्या गेलेल्या आहेत.

राष्ट्रवादीची सत्ता आता गेल्यात जमा आहे. अपक्ष नगरसेवक सुधाकर सोनावणे यांना महापौर केल्याने ते राष्ट्रवादीचे नाहीत. प्रभाग समित्यांच्या निवडणुका न झाल्याने राष्ट्रवादीच्या ताब्यात त्या नसून शिल्लक राहिलेल्या तिजोरीच्या चाव्याही सेनेच्या ताब्यात आल्या आहेत. पालिका राष्ट्रवादी मुक्त झाली आहे.
-विजय नाहटा, उपनेते शिवसेना</strong>

पालिकेतील एकछत्री हुकूमशाहीचा हा अंत होत असल्याची नांदी असून हा सत्याचा विजय आहे. पालिकेत गेली अनेक वर्षे मोठय़ा प्रकल्पांच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून पालिका भ्रष्टाचार मुक्त करण्याचा आमचा निर्धार आहे.
-मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर

काँग्रेसच्या पािठब्यासाठी राष्ट्रवादीने पालिकेत पक्षाला अर्धा वाटा दिला आहे. त्या पक्षाच्या सदस्या पक्षश्रेष्ठींचा आदेश असताना विरोधात मतदान करतात. याचा अर्थ पक्षाने गद्दारी केलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा हा पराजय मोरे यांना मतदान करू दिले नाही यापेक्षा काँग्रेसने विरोधात मतदान केल्याने झाला.
-जयवंत सुतार, सभागृह नेता, राष्ट्रवादी

राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेला स्थागिती देऊन राज्य सरकारने नवी मुंबईतील सत्ताकेंद्राला हा तिसऱ्यांदा धक्का दिला आहे. यापूर्वी प्रभाग समित्यांच्या निवडीला मुख्यमंत्र्यांनी स्थागिती दिली असून स्मार्ट सिटीचा प्रस्ताव सत्ताधारी राष्ट्रवादीने नामंजूर केलेला असताना तो विशेष अधिकारात मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविला होता.