नवी मुंबई : कोविड रुग्णालय सुरू करण्याची परवानगी नसताना करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या वाशीतील एका रुग्णालयाला पालिकेच्या आरोग्य विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. साथ रोग नियंत्रण कायद्याअंर्तगत पालिका या रुग्णालयाला टाळे ठोकू शकते.

कोविड रुग्णालय सुरू करताना केंद्रीय आरोग्य व संशोधन परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ही रुग्णालये सुरू करावी लागतात. मात्र नवी मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढत असून पैसे कमविण्याचे साधन म्हणून या रुग्णांकडे काही रुग्णालये पहात असल्याने पालिकेच्या रडारवर शहरातील साठपेक्षा जास्त रुग्णालये आहेत. त्यातील एकाला टाळे ठोकण्याच्या दृष्टीने पालिकेने कारवाई केली आहे.

पामबीच मार्गावर वाशी विभागातील ‘पामबीच हॉस्पिटल’ने अशाच प्रकारे करोना रुग्णालयाची मान्यता नसताना करोना रुग्णांवर उपचार सुरू केले होते. नवी मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते व कामगार नेते रवींद्र सावंत यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी तक्रार केली. पालिकेच्या आरोग्य विभागाने या रुग्णालयाला पाच कारणेदाखवा नोटिसा दिलेल्या आहेत. एका रुग्णालयाला नोटीस देऊन पालिका आयुक्तांनी शहरातील सुमारे साठ रुग्णालयांना वेळीच आवर घालण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय झोपडपट्टी व ग्रामीण भागात काही डॉक्टरांनी दवाखान्यात एक दोन खाटा टाकून करोना रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत. याकडे पालिकेचे  दुर्लक्ष होत आहे.