पालिकेच्या प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे कामावर येऊनही सफाई कर्मचाऱ्यांच्या ‘गैरहजेरी’ची नोंद

नवी मुंबई पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना  ‘स्मार्ट वॉच’ प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे वेळेवर पगार मिळालेला नाही, तर काहींचे वेतन कापण्यात आलेले आहे. याविरोधात गुरुवारी मुख्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी ठिय्या दिला आणि पालिका अधिकाऱ्यांना मुख्यालयाच्या आवारातून बाहेर वा बाहेरून आत येण्यास मज्जाव केला.

नवी मुंबई पालिकेच्या मुख्यालयासमोर प्रवेशद्वार बंद आंदोलनामुळे अनेक अधिकारी कार्यालयातच अडकले. याचा फटका माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनाही बसला. घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘स्मार्ट वॉच’ प्रणालीतील त्रुटी सुधारण्याची हमी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

‘स्वच्छ भारत अभियाना’तील महत्त्वाचा घटक असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची प्रशासनाकडून सध्या हेळसांड सुरू आहे. पालिकेचा कारभार किती अत्याधुनिक आणि नीटनेटका चालू आहे, हे दाखविण्यासाठी पालिकेने ‘स्मार्ट वॉच’ प्रणाली सफाई कर्मचाऱ्यांच्या मनगटावर बसवली आहे. हे ‘स्मार्ट वॉच’ अर्थात कामाचे ठिकाण आणि कामाची इत्थंभूत माहिती देणारे घडय़ाळच सफाई कर्मचाऱ्यांसाठी नुकसानीचे ठरत आहे. पालिकेत सध्या ३५०० हून अधिक सफाई कर्मचारी आहेत. रस्ते, उद्याने आणि मैदान अशा सर्व विभागांतील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. मात्र गेले तीन महिने अनेक कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही. काम करूनही त्याचा मोबदला मिळालेला नाही. सफाई कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामावर उपस्थित असताना हजेरीपटावर त्याची नोंद होत नाही. प्रशासनाने काम करताना मनगटावर ‘स्मार्ट वॉच’ बांधणे बंधकारक केले आहे. कामचुकारांना वठणीवर आणण्यासाठी हा उपाय परिणामकारक असला तरी नवी मुंबईतील गावठाण परिसर आणि खाडीकिनारी ‘स्मार्ट वॉच’ यंत्रणेतील ‘जीपीआरएस कनेक्टिव्हिटी’ गायब होत असल्याने सफाई कर्मचारी कामावर असतानाही त्यांची नोंद ‘गैरहजर’ अशीच होत आहे. त्यामुळे ‘स्मार्ट वॉच’चा उद्देश सफल झालेला नाही.

घनकचरा विभागाकडून अनुपस्थिती लावल्यामुळे वेतन कमी मिळत असल्याचा दावा अनेक सफाई कर्मचाऱ्यांनी केला. कर्मचाऱ्यांच्या एका  शिष्टमंडळाने याबाबत उद्यान विभागाचे उपायुक्त प्रवीण काळे आणि घनकचरा विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर समस्या मांडल्या.

‘स्मार्ट वॉच’च्या मुद्दय़ावरून याआधीही आंदोलने झालेली आहेत. दर वेळी पालिका अधिकाऱ्यांनी आश्वासनेच दिली आहेत. काम करूनही सफाई कर्मचाऱ्यांच्या हाती कमी वेतन मिळत आहे. कंत्राटदारावर कारवाई केली जात नाही. प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. – मंगेश लाड, समाज समता कामगार संघ

‘स्मार्ट वॉच’ला आवश्यक असलेली कनेक्टिव्हिटी गावठाण आणि खाडीकिनारी मिळत नसेल तर ती समस्या दूर केली जाईल. सफाई कर्मचारी कामावर हजर राहूनही जर त्यांना कमी वेतन मिळत असेल तर त्याची तपासणी करून त्यांना वेतन दिले जाईल. – तुषार पवार, उपायुक्त घनकचरा विभाग