प्रायोगिक तत्त्वावर तीन ठिकाणी सुविधा

संतोष जाधव, लोकसत्ता 

नवी मुंबई : शहरातील प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका  प्रायोगिक तत्त्वावर भूमिगत कचराकुंडय़ा बसविणार आहे. सुरुवातीला तीन भूमिगत कचराकुंडय़ा बसविण्यात येणार असून त्याची ठिकाणेही निश्चित करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

उघडय़ावरील सार्वजनिक कचरा कुंडय़ांमुळे प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम  होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या कुंडय़ा हटवून भूमिगत कचराकुंडय़ांचा प्रयोग पालिकेच्या वतीन राबविण्यात येणार आहे.

शहरात सुरुवातीला घंटागाडीद्वारे कचऱ्याचे संकलन केले जात होते. त्यानंतर मोठय़ा गाडय़ांद्वारे शहरातील कचरा मोठय़ा गाडय़ांद्वारे उचलला जात आहे. तत्कालिन आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी स्थानिक ठेकेदारांकडून उघडय़ा गाडय़ातून कचरा गोळा करण्याचा प्रकार बंद केला.  त्यानंतर कचरा उचलण्याचा   ठेका मंजूर करण्यात आला. त्यानंतर तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तर ‘माझा कचरा माझी जबाबदारी’ या उद्देशाने कचरा वर्गीकरणाची सक्ती केली.

आता नवी मुंबई शहरात विविध आकाराच्या कचराकुंडय़ांमध्ये सार्वजनिक कचरा संकलन केले जात आहे. त्यात ओला आणि सुका कचरा वाहतुकीसाठी वेगवेगळ्या गाडय़ांद्वारे हे काम केले जात आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी असलेल्या कचऱ्याची अवस्था पाहता अनेकदा कचराकुंडय़ा भरून वाहताना दिसतात. त्यामुळे कचराकुंडीभोवती दुर्गंधीचे साम्राज्य पसरलेले दिसते. दुर्गंधी आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भूमिगत सार्वजनिक कचराकुंडय़ा शहरात लावण्याचे प्रस्तावित आहेत. या भूमिगत कचराकुंडय़ा सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणार आहेत. भूमिगत कचराकुंडय़ांमध्ये पावसाळ्यात पाणी साचणार नसल्याची माहिती उपायुक्त तुषार पवार यांनी दिली.

दीड टन क्षमता

भूमीगत कचराकुंडय़ा लावल्याने सार्वजनिक ठिकाणचा कचरा जमा करता येणार आहे. एका भूमीगत कचराकुंडतीत १.५ टन कचरा साठवता येणार आहे.या कचरा पेटय़ांना सेन्सर लावण्यात येणार आहे. गृहसंस्थांमधील कचरा या भूमीगत कचरा कुंडय़ात टाकता येणार नाही.या कचराकुंडय़ांचा आकार १६ बाय २० ते १६ बाय ३२ असा आहे. अशा पद्धतीच्या कचराकुंडय़ा सध्या बंगळूरुमध्ये वापरल्या जात आहेत. एका कचराकुंडीत मोठय़ा प्रमाणात कचरा साठवला जाणार असून यात सोसायटय़ांमधून जमा केलेला कचरा टाकता येणार नाही. कचराकुंडय़ा भरल्यानंतर   याची तंत्रज्ञानाद्वारे माहिती मिळेल व कचरा तातडीने उचलला जाईल.