दंडात्मक कारवाईचा बडगा; २०० रुपये मोजावे लागणार

भिंतींवर पिचकाऱ्या तसेच अस्वच्छता आता महागात पडणार आहे. गुरुवारी झालेल्या तहकूब महासभेत तसा प्रस्ताव मंजूर करण्यात आला शहरात उघडय़ावर शौच, भिंतीवर थुंकणे यांच्यावर नजर ठेवली जाणार असून त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे.

या महिन्यात केंद्र सरकारकडून नवी मुंबईच्या स्वच्छता सर्वेक्षणासाठी पथक येण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने स्वच्छता मोहिमेवर भर दिला जात आहे.

नवी मुंबई शहरातील स्वच्छता नागरिकांच्या अंगवळणी पडावी, स्वच्छतेची सवय व्हावी, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी याकरिता पालिकेने ‘क्लीनअप मार्शल’ योजना हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी, विभागात, सोसायटीत स्वच्छता न ठेवणाऱ्या तसेच स्वच्छतेत बाधा आणणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. ३१ प्रकारच्या अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर दंड आकारणी होणार आहे.

पालिका प्रशासनाने मे महिन्यात हा प्रस्ताव आणला होता. यावेळी सभा तहकूब केल्याने पुन्हा ऑगस्टमध्ये पटलावर घेण्यात आला. मात्र यावेळी नगरसेवकांनी हा प्रस्ताव अभ्यास करून चर्चा करून निर्णय देण्यात येईल या कारणावरून स्थगित ठेवला होता. नवीन वर्षांत ३ जानेवारी रोजी झालेल्या तहकूब महासभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

बाजार समिती, मंडई, मासळी बाजार येथे होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण, व्यवस्थापन न करणे यावर कारवाई केली जाणार आहे. शहरातील बांधकामात निर्माण होणारा कचरा, राडारोडा यावर योजनेअंतर्गत र्निबध घालण्यात येणार आहेत. नाल्यात सोडणाऱ्या सांडपाण्यावरही नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.

याच्या अंमलबजावणीसाठी पालिका एका संस्थेला नियुक्त करणार आहे. नियंत्रण ठेवण्यासाठी एक पर्यवेक्षक आणि विभागानुसार अधिकारी यांची नेमणूक करण्यात येणार आहे. २४ तास कर्मचारी कार्यरत असणार आहेत. यासाठी पालिका स्वत: खर्च करणार नाही. नियुक्ती केलेली संस्थाही पालिकेकडून कोणतेही मानधन न घेता वसूल केलेल्या रकमेतून ४० टक्के महसूल पालिकेला, तर उर्वरित ६० टक्के या कामासाठी वापरली जाणार आहे.

अशी होणार दंडात्मक कारवाई

२०० रुपये : उघडय़ावर थुंकणे, शौचास बसणे

१००० रुपये : सार्वजनिक ठिकाणी वाहने धुतल्यास.

२०० रुपये : वैयक्तिक पातळीवर कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास.

१००० रुपये : सोसायटी पातळीवर

५०० ते ५ हजार रुपये : भिंतीवर अनधिकृत पत्रके लावणे.

०५ ते २५ हजार रुपये :  प्लास्टिक पिशवी वापर केल्यास.