कोकण विभागीय आयुक्तांकडून आढावा बैठक

नवी मुंबई : मुंबईसह आजूबाजूच्या महानगर प्रदेशाला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या तुर्भे येथील पाच घाऊक बाजारपेठांपैकी धान्य व भाजीचा घाऊक बाजार गुरुवारी तुरळक प्रमाणात सुरू करण्यात आले. कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी या संर्दर्भात दुपारी एक बैठक घेऊन पुढील दिवसांचे नियोजन केले. या बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांना मास्क व हात स्वच्छ धुण्याची व्यवस्था केली जाणार असून बाजारपेठांची जंतुनाशक औषधांनी फवारणी देखील करण्यात आली आहे.

देशात करोना विषाणूचा फैलाव मोठय़ा प्रमाणात होऊ लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांची टाळेबंदी जाहीर केली आहे. या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाईल असे केंद्र व राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. नवी मुंबईतील तुर्भे येथील पाच घाऊक बाजारपेठा ह्य़ा मुंबईसह आजूबाजूच्या सर्व शहरांना या जीवनावश्यक वस्तूंचा घाऊक किमंतीत पुरवठा करीत असतात. टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर या पाच बाजारात व्यापार करणाऱ्या तीन हजार व्यापाऱ्यांनी बुधवारपासून सात दिवसांची टाळेबंदी जाहीर केली होती. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या ह्य़ा बाजारपेठा असल्याने त्यांना परस्पर निर्णय घेऊन अशा प्रकारची टाळेबंदी जाहीर करता येणार नाही असे शासनाने बुधवारी स्पष्ट केले.

त्यामुळे गुढीपाडव्याची सुट्टी वगळता या बाजारपेठा सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून गुरुवारी कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी धान्य बाजारातील व्यापाऱ्यांची एक संयुक्त बैठक घेऊन शासनाच्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी ही बाजारपेठेतील दुकाने सुरू केली. मात्र मसाला, कांदा, फळ बाजारातील व्यापाऱ्यांनी या टाळेबंदीच्या काळात घरीच बसणे रास्त मानले आहे.

जीव धोक्यात घालून व्यापार करायचा कोण?

या घाऊक बाजारात व्यापार करण्यास व्यापारी इच्छूक नाहीत. अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या कामगारांना दुकानात बसवून (तसे अनेक कामगार व कर्मचारी हे याच पेढय़ांवर राहात असल्याचे दिसून येते) घरी राहणे पसंत केले आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची हमी दिल्याने हा माल उपलब्ध करण्याची शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या पाच बाजारपेठा सुरू राहणे आवश्यक असल्याने महसूलअधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना सज्जड दम दिला आहे. बाजारात येणाऱ्या प्रत्येक घटकाला हात स्वच्छ धुण्याची व्यवस्था व तोंडावर मास्क देण्याची अटही एपीएमसी प्रशासनाने मान्य केली आहे. सर्व सुविद्या घ्या पण बाजारहाट सुरू ठेवा अशी शासनाची भूमिका आहे. त्याला व्यापारी वर्ग फारसा दाद देईनासा झाला आहे. जीव धोक्यात घालून व्यापार करायचा कोणी असा सवाल त्यांचा आहे. २६ टेम्पो

भाजीची अवक

मुंबईसह एमएमआरडीए क्षेत्राला दैनंदिन भाजी पुरवठा करणे आवश्यक असल्याने भाजी बाजार पूर्णपणे सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. त्यामुळे आज या बाजारात २६ ट्रक टेम्पो भाजी आली आहे तर फळांचे पाच ट्रक आल्याची नोंद आहे. इतर तीन बाजारात एकही ट्रक टेम्पो माल आला नाही.

बाजारात मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या गर्दीचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना सर्व सुविद्या देण्याची मागणी केली आहे. भाज्यांची तुरळक आवक आजपासून सुरू झाली असून शनिवारी ही आवक वाढण्याची शक्यता आहे.

-शंकर पिंगळे, संचालक, घाऊक फळ बाजार, एपीएमसी