जगण्याचा संघर्ष; सुविधांपासून वंचित; ना डोक्यावर टोपी; ना पिण्यासाठी थंड पाणी

नवी मुंबई : डोक्यावर कडाक्याचे उन्ह, अंगात घामाच्या धारा, पिण्याच्या पाण्याची वाणवा, मिळालेच तर तोंडात पण घेता येणार नाही इतकं गरम पाणी, कंत्राटदाराने दिलेला खादीचा जाड गणवेष, त्यात असह्य़ झालेला जीव, साध्या टोपीची कमतरता, दुपारच्या वेळेस नकोशा वाटणाऱ्या रस्त्यावरील उन्हाच्या झळा.. अशा प्रतिकूल परस्थितीत रस्ते साफसफाई करणारे हजारो कामगार केवळ महिन्याकाठी चौदा ते पंधरा हजार रुपयात कडाक्याच्या उन्हात जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत.

स्वच्छअभियानाला मूर्त स्वरूप देणारो हजारो साफसफाई कामगार आजही अनेक सुविधांपासून वंचित आहेत. घनकचरा व्यवस्थापनानंतर या कंत्राटी कामगारांना किमान वेतन म्हणून १४ हजार ८०० रुपये दिले जातात, पण मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या महागाईच्या शहरात केवळ १४ हजार रुपयात जीवन जगणे मुश्कील झाले आहे. संततधार पडणाऱ्या पावसात आपल्या अखत्यारीतील क्षेत्रफळाच्या स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या साफसफाई कामगारांना पावसाळ्यात कंत्राटदार रेनकोट, गमबुट अशा सुविधा देण्याचा प्रयत्न करतात. अशा सुविधा मिळाव्यात म्हणून कामगार संघटना प्रशासनाशी संघर्ष करताना देखील दिसतात, पण आग ओकणाऱ्या उन्हाळ्यात किमान डोक्यावरील टोपी अथवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कंत्राटदारांनी करून द्यावी यासाठी प्रशासनाने कधी दबाव आणला असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे भर उन्हात हातात झाडू घेऊन रस्ता साफ करणारे वेळप्रसंगी गटारात उतरून गटार स्वच्छ करणाऱ्या साफसफाई कामगारांना कडक उन्हापासून थोडा फार बचाव व्हावा यासाठी एक साधी टोपी कंत्राटदार देत नाहीत. त्यामुळे पहाटे सात ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत साफसफाई करणारे हजारो कामगार रस्त्यावरील उन्हाच्या झळा सोसत साफसफाई करीत असल्याचे दिसून येते. नवी मुंबई पालिका क्षेत्रात पाणीपुरवठा, उद्यान, मलनि:सारण वाहिन्या आणि रस्ते सफाई अशा सर्व सेवा सुविधांसाठी एकूण नऊ हजार साफसफाई कामगार कंत्राटी पद्धतीने गेली २५ वर्षे काम करतात. उन्हाची तीव्रता वाढत असून मे व जून महिन्यात ती अधिक जाणवणार आहे. समुद्राजवळ असलेल्या मुंबई, नवी मुंबई भागात ही तीव्रता विर्दभ, मराठवाडय़ाएवढी नसली, तरी सकाळी अकरानंतर उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागत आहेत. त्यामुळे अनेक नागरिक या काळात घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. अशा कडाक्याच्या उन्हात साफसफाई कामगारांना आपले काम पूर्ण करावे लागत आहे. अशा वेळी पिण्याच्या थंड पाण्याची गरज मोठय़ा प्रमाणात जाणवत असते. ठाणे बेलापूर व पामबीच असे दोन मोठे मार्ग यांत्रिकी पद्धतीने स्वच्छ केले जातात. त्यावेळी या यांत्रिकी वाहनाबरोबर काम करणाऱ्या साफसफाई कामगारांना वाटेत लागणाऱ्या कारखान्यातील पिण्याच्या पाण्याच्या नळांवर अवलंबून राहावे लागते.

काही व्यवस्थापन या कामगारांना थंड व स्वच्छ पाणी देतात पण असे पाणी न मिळाल्यास नळाचे गरम पाणी पिण्याशिवाय या कामगारांना दुसरा पर्याय राहात नाही. त्यामुळे यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करणाऱ्या वाहनात या कामगारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.

नवी मुंबई पालिका क्षेत्रातील साफसफाई कामगारांची सर्व प्रकारे काळजी घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. कंत्राटदारांकडून सर्व सेवा व सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासन दक्ष आहे, पण उन्हाच्या बचावासाठी कामगारांना द्यावयाच्या सुविधांबाबत यानंतर नक्कीच विचार केला जाईल. हा एक चांगला विचार आहे.

-तुषार पवार, उपायुक्त (घनकचरा) नवी मुंबई पालिका

साफसफाई ही आमची मजबुरी आहे. आमच्या सेवा सुविधांबाबत कोणाला फारशी काळजी नाही. पावसाळ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसात एखादा निवारा बघून आम्ही आसरा घेऊ शकतो, पण उन्हाळ्यात तप्त उन्हाचा झळा कोणाच्या लक्षात येत नाहीत. साधी टोपी किंवा पिण्याचे पाणी आम्हाला वेळेवर मिळत नाही, पण उन्हाचे कारण न देता काम हे करावेच लागते.

– किरण तांबे, साफसफाई कामगार, ठाणे बेलापूर मार्ग