कळंबोली सर्कलजवळ अपघातात गर्भवती गंभीर जखमी
शीव-पनवेल महामार्गावर कळंबोली सर्कल येथे सिग्नलजवळ रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास भरधाव झायलो उड्डाणपुलाखालील दुभाजकावर चढली. या वेळी तेथे बसलेल्या तिघांना जीपने चिरडले. यात एका वृद्धेचे पायाचे हाड तुटले, तर तरुणाच्या तोंडाला मार लागला आहे. यात एक गर्भवती महिलाही गंभीर जखमी झाली आहे. तिघांवर एमजीएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शैनाबाई पवार, सूरज भोसले आणि सप्पीरीता भोसले असे जखमींची नावे आहेत.
अपघातामधील सप्पीरीता हिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जखमींचे नातेवाईक मिनी मिलास, आणि पवनी पवार यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार दुपारच्या जेवणानंतर सर्वजण उड्डाणपुलाखाली बसले होते, तर काहीजण झोपले होते. याच वेळी ही दुर्घटना घडली. याप्रकरणी कळंबोलीचे साहाय्यक पोलीस निरीक्षक पी. बी. पोतदार यांनी झायलो चालक मनोज पोकनाक याला अटक केली आहे. महाड येथील एका अंत्यविधीसाठी झायलोचालक मनोज प्रवाशांना घेऊन जात असताना हा अपघात घडला.

भिकारी वाढले
कळंबोली सर्कल हा परिसर यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली येत असल्याने येथे अवाढव्य जागा मोकळी आहे. येथे सिग्नल असल्याने मुंबईहून कोकणात जाणाऱ्या वाहनांना या सिग्नलवर १८० सेकंद थांबावे लागते. याचाच फायदा दुष्काळी भागाच्या नावावर येथे अचानक स्थलांतरित झालेल्यांनी येथे घेतल्यामुळे या उड्डाणपुलाखाली अचानक दीडशे स्त्री, पुरुष व लहान बाळांना घेऊन ५० ते ६० कुटुंबे राहू लागल्याने कळंबोली सर्कलवरील सिग्नल आणि मॅकडोनाल्ड हॉटेल समोरील भिकाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर कळंबोली पोलिसांनी उड्डाणखालच्या अचानक स्थलांतरित झालेल्यांना समज देऊन इतर ठिकाणी त्यांनी स्थलांतर करण्यासाठी दबाव सुरू केला आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी वाहतूक पोलिसांनी याच उड्डाणखालच्या स्त्री-पुरुषांना दिवाळीची मिठाई, कपडे आणि चादरी वाटल्या होत्या.