शेतकरी आणि ग्राहक यांच्यामध्ये असलेला दलाल वजा करून शेतकऱ्यांना थेट शेतमाल विकता यावा यासाठी राज्य सरकारने बाजार समितीमुक्त व्यापार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याला व्यापारी व माथाडी कामगारांनी तीव्र विरोध केला आहे. या विरोधाची व्याप्ती राज्यभर करण्यासाठी ८ जून रोजी तुर्भे येथील एपीएमसी बाजार समितीत राज्यातील सर्व बाजार समिती व्यापाऱ्यांना आमंत्रित करण्यात येणार असून त्याच दिवशी व्यापारी, माथाडी आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. दरम्यान बुधवारी सकाळी नऊ वाजता पाचही बाजार बंद ठेवून सरकारच्या या संभाव्य निर्णयाचा एका सभेद्वारे निषेध केला जाणार आहे.

बाजार समितीत असणाऱ्या व्यापाऱ्यांमुळे शेतकरी व ग्राहक यांना नाहक भरुदड पडत आहे. या दलालामुळे शेतकऱ्याला कमी भाव आणि ग्राहकाला जास्त भाववाढ सहन करावी लागत असल्याने शेतकरी व ग्राहक यांच्या मध्ये असलेले हे दलालच कमी करण्यात यावेत, असे आदेश केंद्र सरकारने दिलेले आहेत. त्यामुळे शेतकरी आपला शेतमाल थेट बाजारात आणून विकू शकणार आहे. नियंत्रण मुक्त व्यापाराची अंमलबजावणी भाजपा सरकार लवकरच करणार आहे. बाजार नियंत्रण मुक्त केल्यास या बाजारावर अवलंबून असणारे व्यापारी, माथाडी, मापाडी, वाहतूकदार, हमाल अशा हजारो कामगारांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी तुर्भे येथील एपीएमसीतील पाच बाजारपेठेतील शेकडो व्यापाऱ्यांनी मंगळवारी माथाडी भवन येथे एक बैठक घेतली. राज्यातील सर्व बाजार समितीतील व्यापाऱ्यांना एकत्र बोलवून राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरविण्याचा निर्णय या व्यापाऱ्यांनी घेतला.