व्यापार करण्याची मुभा मिळत नसल्याच्या तक्रारी; अंतराचा नियम पाळण्यावर भर देण्याची मागणी

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भाजीपाला बाजारात टोकन पद्धत सुरू करण्यात आली आहे. याद्वारे शेतमाल घेऊन आलेल्या वाहनांना मर्यादित प्रवेश दिला जात आहे. यातही अनेक त्रुटी असून काहींना व्यापार करण्याची मुभा मिळत नाही,तर काही व्यापारी या पद्धतीने त्रस्त झाले आहेत. टोकन पद्धती बंद करून अंतराचा नियम पाळण्याची खबरदारी घेत पूर्वीसारखे व्यापार,व्यवहार सुरू करावेत, असा सूर व्यापारी वर्गातून उमटत आहे.

नवी मुंबई शहरात एपीएमसी बाजार समिती ही करोना संसर्ग पसरविण्याचे माध्यम ठरल्याचे मानले जात आहे. त्यामुळे याठिकाणी गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भाजीपाला बाजारात टोकन पद्धतीने शेतमालाची गाडी मागविण्यात येत आहे. परंतु, आता भाजीपाला बाजारात तीन चार महिन्यांपासून बाजारात येत नसलेले व्यापारीही येत आहेत. त्यामुळे अनेकांना या टोकन पद्धतीमुळे व्यापार करता येत नाही. श्रावण महिना सुरू होताच बाजारात भाजीपाल्याची आवक वाढते. भाजीपाला बाजारात ५५०ते ६०० गाडय़ा येतात. आता केवळ ३७५ गाडय़ांना टोकन पद्धतीने सोडल्या जात आहेत.

या पद्धतीत सध्या गोंधळ सुरू आहे. यातून पैसे उकळले जात असल्याचा आरोप व्यापारी करीत आहेत. प्रमाण तीन टक्के एपीएमसी बाजार समितीत ही करोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिजन चाचणी सुरू करण्यात आलेली आहे. गेल्या दोन आठवडय़ापासून बाजारात आतापर्यंत २५०० प्रतिजन चाचणी करण्यात आल्या असून ७५ ते१०० दरम्यान करोना रुग्ण आढळले असून करोना बाधितांचे प्रमाण तीन ते चार टक्के असल्याची माहिती नवी मुंबई पालिकेने दिली आहे.

अधिकारी करोना विळख्यात

एपीएमसी भाजीपाला बाजारात गर्दी वर नियंत्रण, अंतराचा नियमात राहून काम करून घेण्यासाठी संबंधित उपसचिव यांच्याकडे जबाबदारी देण्यात आहे,  मात्र माजी उपसचिव याना  करोना लागण झाली. त्यांच्या गैरहजरीत बाजारात भोंगळ कारभार सुरू झाला होता. नुकतेच उपसचिव पदभार दुसऱ्या अधिकाऱ्याला सुपुर्द करण्यात आला होता. मात्र,  त्या अधिकाऱ्यालाही करोनाची लागण झाली आहे.

एपीएमसी बाजारात सुरू असलेली टोकन पद्धती बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्याबाबतची  बैठक घेणार आहोत.

-अनिल चव्हाण, सचिव एपीएमसी