खारघर टोलनाक्यावरील वसुली घटली; वाहतूक कोंडी, टोलवाढीचा परिणाम

शीव-पनवेल महामार्गावरील खारघरजवळील कोपरा व कामोठे येथील टोलनाक्याचा ठेका रद्द करून ‘एमएसआरडीसी’कडे हस्तांतरित करण्यात आला असून वाढीव दरानुसार एका संस्थेमार्फत वसुली करण्यात येत आहे. मात्र टोलवाढ व महामार्गावरील कामांमुळे जड वाहनांनी आपला मार्गच बदलला आहे. तळोजा एमआयडीसीकडून शीळफाटा मार्गे ही वाहन जात असल्याने खारघर टोलवरील वसुली दिवसाला दोन ते तीन लाखांनी कमी होत आहे.

टोलनाका ठेकेदार मे. डी. आर सíव्हसेस कंपनी नियमानुसार टोलवसुलीची रक्कम सरकारकडे जमा करीत नसल्याचा आरोप करून खारघर टोलनाका सार्वजनिक बांधकाम विभागाने ताब्यात घेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडे हस्तांतरित करून मे. सहकार ग्लोबल लि. यांच्याकडून टोलवसुली सुरूकरण्यात आली आहे. तसेच तीन वर्षे टोलवाढ केली नसल्याचे कारण देत टोल वाढविला आहे. टेम्पो, मिनी बस, ट्रक, ट्रेलर या जड वाहनांच्या टोलदरात वाढ करण्यात आली आहे.

तसेच पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून शिरवणे, नेरुळ, खारघर आणि कोपरा उड्डाणपुलांवर सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीटीकरणामुळे  शीव-पनवेल महामार्गावर सकाळ, संध्याकाळ वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मुंबई-पुण्याकडे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांची कोंडीमध्ये एक ते दोन तास वाया जात आहेत.

अतिरिक्त टोलवाढ व रखडपट्टी टाळण्यासाठी जड वाहनांनी आपला मार्ग बदलल्याचे दिसून येत आहे. शीव-पनवेल महामार्गावर तळोजा एमआयडीसीमार्गे ही वाहतूक पुढे शिळफाटामार्गे गुजरातच्या दिशेने जात आहे. त्यामुळे खारघर टोलवरून दिवसाला सरासरी १० हजार जड वाहने जात असत, हे प्रमाण दीड ते दोन हजारांनी कमी झाले असून सध्या वाहनांचे प्रमाण आठ ते साडेनऊ  हजारांपर्यंत आहे. यामुळे दररोज १९ लाखापर्यंत होणारी वसुली आता १७ ते १८ लाखापर्यंतच होत असल्याचे टोल कर्मचाऱ्यांनी सांगितले.

वसुली कमी होण्याची कारणे

  • खारघर टोलनाक्यावर १ एप्रिलपासून टोल महाग झाला आहे. अधिकचा टोल चुकवण्यासाठी जड वाहने तळोजा एमआयडीसीकडून शीळफाटा, मुंब्रा मार्गे पुढे जात आहेत.
  • सायन-पनवेल महामार्गावर मोठय़ा प्रमाणात रस्ते काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून सातत्याने होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहने या मार्गाचा वापर टाळत आहेत.

खारघर टोलनाक्यावरील वसुली ‘एमएसआरडीसी’मार्फत एका संस्थेला देण्यात आली आहे. येथील टोलवसुलीबाबत अधिक माहिती घेण्यात येईल. तसेच या ठिकाणच्या कामकाजावर देखरेखीसाठी दोन अधिकाऱ्यांची लवकरात लवकर नेमणूक करण्यात येईल.   – शशिकांत सोनटक्के, कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी