अवजड वाहतूक आणि पार्किंगमुळे नवी मुंबईत कोंडी

नवी मुंबईतील रस्त्यांवर जेएनपीटी बंदराकडे जाणाऱ्या कंटेनरची वाहतूक वाढली आहे. उरण फाटय़ापासून पालिका मुख्यालयाकडे येणारा आम्रमार्ग अवजड वाहनांमुळे धोकादायक बनला आहे. येथे नियमित होणाऱ्या कोंडीमुळे हा आम्रमार्ग आहे की कंटेनरमार्ग, असा प्रश्न येथील रहिवासी उपस्थित करू लागले आहेत. किल्ले गावठाण चौक तसेच त्यामागील रस्त्याचे रुंदीकरण सुरू असल्याने या मार्गावर नेहमी वाहतूक कोंडी होते. वाहतूक विभागाने या रस्त्यावरील वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

शीव-पनवेल माहामार्गावरून उरण फाटय़ापासून पालिका मुख्यालयापर्यंत येणारा रस्ता आम्रमार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावरून जेएनपीटीकडे ये-जा करणाऱ्या कंटेनरची संख्या मोठी आहे. शीव-पनवेल महामार्गाच्या रुंदीकरणापूर्वी उरण फाटय़ावर कंटनेरमुळे वाहतूक कोंडी होत असे. बेलापूर खिंडीच्यालगत उड्डाणपूल बांधूनही वाहतूककोंडीची समस्या सुटलेली नाही. आम्रमार्गाच्या दोन्ही बाजूंना मोठय़ा प्रमाणात रहिवासी वस्ती आहे. एकीकडे एकता विहार आणि दुसरीकडे भीमाशंकरसह अनेक मोठी गृहसंकुले आहेत. मार्गाच्या बाजूलाच नेरुळमधील रायन इंटरनॅशनल स्कूल आहे. तसेच पुढे वंडर्स पार्क आहे. पारसिक हिलवरील महापौर निवासाकडे जाण्यासाठी याच चौकातून जावे लागते. आम्रमार्गाला लगतच्या परिसरात जाण्यासाठीच्या लहान-मोठी वाहने मुख्य रस्त्यावर येत असताना अनेक अपघात होतात. किल्ले गावठाण चौकात कंटेनरच्या रांगांमुळे वाहतूककोंडी होते. नागरिक, कर्मचारी किल्ले गावठाण चौकातून पालिका मुख्यालयाकडे ये-जा करतात. त्यामुळे हा चौकही धोकादायक व अतिवर्दळीचा झाला आहे.

पारसिक हिलच्या पायथ्याशी असलेल्या चौकात लावलेला सिग्नल अनेकदा बिघडलेलाच असतो. त्यामुळे येथील चौकही धोकादायक बनला आहे. आम्रमार्गावर अनेक ठिकाणी मोठे गतिरोधक आहेत. त्यावर कंटेनर आदळून मोठा आवाज होतो. रात्री जेएनपीटीत सामान रिकामे करून आलेले कंटेनर गतिरोधकावरून जाताना मोठा आवाज होतो. रस्त्याच्या कडेला रात्रंदिवस कंटेनर मोठय़ा प्रमाणात उभे केलेले असतात. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडते.

कंटेनरची वाहतूक कळंबोली मार्गावरून वळवण्याची मागणी करण्यात येत आहे. रस्त्याच्या कडेला कंटेनर उभे करणाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात येत आहे. नेरुळ सेक्टर १९ मध्ये सुरू होणाऱ्या वाहतूक तपासणी केंद्राकडे जाण्यासाठी याच मार्गावर वाहतूक होणार आहे. त्यामुळे अधिकच असलेल्या गर्दीत आणखीही काही वाहनांची भर पडून वाहतूक कोंडीची समस्या तीव्र होण्याची भीती रहिवासी व्यक्त करत आहेत.

आम्रमार्गावर कंटेनर उभे करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. या मार्गाच्या कडेला उभ्या राहणाऱ्या वाहनांवरही कडक कारवाई करण्यात येईल. किल्ले गावठाण चौकाजवळ रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यावरील अवजड वाहतूक अन्य मार्गाने वळवण्याची कार्यवाही वाहतूक विभागाने सुरू केली आहे.

नितीन पवार, उपायुक्त, वाहतूक विभाग