23 July 2019

News Flash

वाहतूक कोंडी सोडवताना वाहनाची धडक, मुलीच्या वाढदिवशीच पोलिसाचा मृत्यू

बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास तळोजा एमआयडीसीत खड्डयांमुळे वाहतूक कोंडी झाली. वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस हवालदार अतुल घागरे हे वाहतूक कोंडी सोडवत होते.

शेखर हंप्रस, नवी मुंबई

नवी मुंबई परिसरातील खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडवताना बुधवारी पहाटे एका वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाला. तळोजा एमआयडीसीत ही घटना घडली असून अतुल घागरे असे या मृत्यू झालेल्या पोलिसाचे नाव आहे. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. अतुल घागरे यांच्या मुलीचा आज वाढदिवस होता. वाढदिवसालाच त्या चिमुरडीचे पित्याचे छत्र हरपले.

बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास तळोजा एमआयडीसीत खड्डयांमुळे वाहतूक कोंडी झाली. वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस हवालदार अतुल घागरे हे वाहतूक कोंडी सोडवत होते. खड्डे ओलांडताच वाहने सुसाट निघत होते. अशाच एका वाहनचालकाने घागरे यांना धडक दिली. घागरे यांना मदत करण्याऐवजी चालकाने वाहनासह तिथून पळ काढला.

घागरे जखमी झाल्याचे काही सतर्क वाहनचालकांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती वाहतूक पोलिसांना दिली. घागरे यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोवर त्यांचा मृत्यू झाला होता.

घागरे यांची पत्नीही पोलीस विभागात असून नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्या कार्यरत आहेत. आजच घागरे यांच्या मुलीचा वाढदिवस असल्याचे समजते.

वाहतूक कोंडीचा कॉल अटेंड करून दुचाकी वरून परतत असताना त्यांना वाहनाने धडक दिली. या प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ठिकाणी प्रचंड वाहतूक असूनही केवळ एकाच वाहतूक पोलिसाची ड्युटी लागण्यात आली होती. वाहतूक पोलिसांचे अपुरे संख्याबळ आणि खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडीची समस्या या घटनेतून समोर आली आहे.

First Published on September 5, 2018 11:18 am

Web Title: traffic police killed by speeding vehicle in taloja midc