वाहन अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान सुरू झाले आहे. यात विविध कार्यक्रमांतर्गत नागरिकांना नियमांविषयी माहिती देण्यात येणार आहे. वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या चालकांना प्रोत्साहन दिले जाईल. शिरस्त्राण (हेल्मेट) वापरणाऱ्या दुचाकीस्वार आणि कारमध्ये ‘सीट बेल्ट’ लावणाऱ्यांचा आणि सिग्नलचे नियम पाळणाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या वेळी वाशी येथे ‘हेल्मेट रॅली’ काढण्यात आली. यात वाहतूक शाखेचे २० पोलीस अंमलदार आणि ‘रॉयल इनफील्ड ओनर्स संघटने’च्या ४० चालकांनी सहभाग घेतला होता. रॅलीतील सहभागींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यात विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता.
नियम तोडणाऱ्या चालकांना तिळगूळ वाटप करण्यात आले. रस्ता सुरक्षा अभियानात वाहतूक पोलीस आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या वतीने रॅली काढण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी बॅनर्सच्या माध्यमातून नागरिकांना वाहन सुरक्षेचा संदेश दिला. नवी मुंबईतील विविध महाविद्यालय आणि शाळांमध्ये वाहन चालविताना कोणती काळजी घावी, कोणते नियम पाळावेत, याविषयी मार्गदर्शन करण्यात येत असून विद्यार्थ्यांना चित्रफिताच्या माध्यमातून रस्ते अपघात आणि त्यात जखमी होणाऱ्या आणि बळी जाणाऱ्यांविषयीची माहिती देण्यात आली. दुचाकीस्वारांत हेल्मेटविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने महिलांची दुचाकी रॅली काढण्यात आली.