उरण, पनवेल व जेएनपीटी बंदर परिसरात येण्यासाठी उरण-पनवेल रस्त्यावरील गव्हाणफाटा हे महत्त्वाचे ठिकाण असून या फाटय़ावर सध्या सकाळी अकरा वाजताच वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणारे प्रवासी, विद्यार्थी तसेच वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या कोंडीत तब्बल दोन ते तीन तास काढावे लागत असल्याने वेळ व इंधनही वाया जात आहे. सध्या या मार्गावर नवी मुंबईतील किल्ले गावठाण ते गव्हाण फाटा दरम्यान येणाऱ्या जड वाहनांची संख्या वाढल्याचे वाहतूक विभागाचे म्हणणे आहे.
उरण-पनवेल तसेच नवी मुंबईला जोडण्यासाठी तसेच मुंबई-गोवा आणि मुंबई-पुणे या राष्ट्रीय महामार्गाना जोडण्यासाठी गव्हाण फाटा सोयीस्कर आहे. त्यामुळे गव्हाण फाटय़ावर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. या फाटय़ावर नवी मुंबई वाहतूक आयुक्तालयातील उरण, पनवेल तसेच नवी मुंबई या हद्दी येतात. त्यामुळे तीनही हद्दीतील वाहतूक पोलिसांच्या समन्वयाची गरज आहे. तसेच या मार्गावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब वरून येणाऱ्या जड वाहनांमुळेही प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने एका महागामार्गावरून दुसऱ्या महामार्गावर उतरण्यासाठी असलेले रस्ते हे अधिकृत तयार करावेत तसेच बेकायदा रस्ते बंद करावेत, अशी मागणी पुढे आली आहे. गव्हाण फाटा येथील वाहतूक कोंडीचा परिणाम गव्हाण फाटा ते पनवेल दरम्यानच्या रस्त्यावरही होऊ लागला आहे.
वाहतूक कोंडी रोखण्यासाठी गव्हाण फाटा ते जेएनपीटीदरम्यान जड वाहनांची वाहतूक सायंकाळी ५ ते ८ या कालावधीत बंद करण्यात आल्याची माहिती उरण वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर जगताप यांनी दिली.