तुर्भे तिहेरी हत्याकांडाचा उलगडा; मध्य प्रदेशातून दोघांना अटक

तुर्भे येथील तिहेरी हत्याकांडाचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून होत असलेल्या जाचाला कंटाळून काम सोडावे लागल्याने याचा बदला घेण्यासाठी माजी कामगाराने भावाच्या मदतीने तिघांचा खून केला. याप्रकरणी या दोन्ही आरोपींना पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली आहे. आरोपींना ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

सेबू हनीफ खान पठाण (वय २५) आणि शेरूहनीफ खान पठाण (वय २४) अशी  अटक आरोपींची नावे आहेत. या दोघांनी १२ जुलै रोजी रात्री बोन्सारी गावातील भंगाराच्या दुकानात काम करणारे राजेश पाल, इर्शाद खान आणि नौशाद खान या तिघांची निर्घृण हत्या केली होती. यामुळे नवी मुंबई हादरली होती.

पोलिसांच्या हातात कुठलेही धागेदोर नव्हते. पूर्वी या ठिकाणी कोण काम करत होते का? हत्या झालेल्या तिघांची कोणाशी भांडणे आहेत का? या दिशेने पोलीस तपास करीत असताना आरोपी सेबू या ठिकाणी काम करीत होता व त्यांच्यात भांडणे होत असल्याची माहिती मिळाली. तीन महिने अगोदर आरोपी सेबूने काम सोडले होते. पोलिसांनी सेबूचा शोध सुरू केल्यानंतर तो मूळचा उत्तर प्रदेशातील असून सध्या मध्य प्रदेश (सतना) येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक त्याच्या मागावर तेथे पोहोचले. त्यांनी सेबूला अटक केल्यानंतर त्याने भाऊ शेरू याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यावरून शेरूलाही अटक करण्यात आली.

आरोपी सेबूने या ठिकाणी तीन महिनेच काम केले होते. मात्र सततचे काम, सारखी अपमानास्पद वागणूक सहन न झाल्याने त्याने काम सोडले होते. तीन महिने गेल्यानंतर त्याने भावाच्या मदतीने गुन्ह्याची योजना आखली. ११ जुलै रोजी ते दोघे मध्य प्रदेश येथून नवी मुंबईला येण्यास निघाले. सकाळी नवी मुंबईत पोहचल्यावर त्यांनी हा परिसर पुन्हा नजरेखालून घातला. रात्र होण्याची वाट पाहत दिवसभर भटकल्यानंतर रात्र झाल्यावर चाकू, कोयता घेऊन भंगार दुकानात जात तिघांची हत्या केली. यानंतर लगेच कुर्ला टिळकनगर रेल्वे स्टेशन गाठत मध्य प्रदेश गाठले.

या दोन्ही आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी असून, यातील सेबू यांच्यावर अवैध शस्त्र बाळगणे आणि हत्येचा प्रयत्न, असे गुन्हे दाखल असून शेरू याच्यावर हत्येचा प्रयत्न, साखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती गुन्हे शाखा उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.

या तपासात तुर्भेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई, पोलीस निरीक्षक शिरीष पवार, विजय कादमाने, सुनील शिंदे, साहाय्य्क पोलीस निरीक्षक संतोष जाधव, सचिन मोरे, राहुल राख, दीपक डोंब, पोलीस उपनिरीक्षक विजय चव्हाण, योगेश वाघमारे, सुनील सावंत, सम्राट वाघ आदींनी सहभाग घेतला.