मुंबई : परळ येथील टाटा कर्करोग रुग्णालयात उपचार घेणाऱ्या १७६ कर्करोग रुग्णांना करोनाची बाधा झाली असून या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयाच्या मदतीला मुंबई महापालिका धावून आली आहे. वरळी येथील पालिकेच्या एनएससीआय डोम करोना केंद्रामध्ये दाखल करण्यात आलेल्या या १७६ पैकी १२६ कर्करोग रुग्ण करोनामुक्तझाले. जगभरात करोनाची बाधा झाल्यामुळे कर्करोग रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. मात्र या केंद्रातील करोनाबाधित कर्करोग रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याबद्दल कौतुक होत आहे.

प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तीचा करोनाच्या बाधेमुळे मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे अशा रुग्णांबाबत विशेष काळजी घ्यावी लागते. विशेष म्हणजे करोनाची बाधा झालेले मूत्रपिंड विकारांनी ग्रस्त आणि कर्करोग रुग्णांच्या उपचाराकडे लक्ष द्यावे लागते. गेल्या २० दिवसांमध्ये मुंबईत करोनाबाधित एकाही डायलिसिसची गरज असलेल्या रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. मूत्रपिंड विकाराने त्रस्त रुग्णांच्या डायलिसिससाठी स्वतंत्र केंद्र आणि सयंत्र उपलब्ध करण्यात आले आहे. आता करोनाबाधित कर्करोग रुग्णांचीही विशेष काळजी घेण्यात येत आहे.

पाश्चिमात्य देशांमध्ये करोनाची बाधा झालेल्या कर्करोग रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण साधारण ५० टक्के  इतके आहे. करोनाविषयक मार्गदर्शक तत्त्वांनुसार करोनाबाधित कर्करोग रुग्णांना सर्वसाधारण करोना उपचार केंद्रात एकत्र ठेवता येत नाही. त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागते. या पार्श्वभूमीवर वरळी येथील एनएससीआय डोम करोना काळजी केंद्रात करोनाबाधित कर्करोग रुग्णांसाठी व्यवस्था पालिकेने केली आहे. टाटा कर्करोग रुग्णालयात देशभरातून रुग्ण येत असतात. या रुग्णालयातील १७६ कर्करोग रुग्णांना करोनाची बाधा झाली होती. त्यांना एनएससीआय डोम करोना काळजी केंद्रात दाखल करण्यात आले आहे. यात दोन वर्षांच्या चिमुकल्याचा, तसेच ७७ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. त्यापैकी १२६ जणांची करोनाविषयक चाचणी नकारात्मक आली आहे.