News Flash

उलवा सपाटीकरणासाठी आजपासून स्फोट

गुरुवारी सकाळी विधिवत पूजा करून या कामाचा शुभांरभ करण्यात आला.

प्रवेश निषिध्द; खोदकामासाठी १३०० स्फोट घडवणार

उलवा टेकडीच्या सपाटीकरणासाठी मोठय़ा प्रमाणात सुरुंग खोदावे लागणार असल्याने होणारे स्फोट आजपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे  स्फोटाच्या वेळी या भागात प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे.

उलवा टेकडीच्या खोदकामासाठी जवळपास १३०० स्फोट केले जाणार असून त्यासाठी सुरुंग पेरणी गेल्या चार दिवसापासून सुरू होती. जे. एम. म्हात्रे इन्फ्रा आणि ठाकूर इन्फ्रा या स्थानिक ठेकेदारांना टेकडीच्या सपाटीकरणाचे काम देण्यात आले असून या कामावर उत्तरांचलमधील सीआयएमएफआर या केंद्र सरकारची संस्था देखरेख ठेवणार आहे. गुरुवारी सकाळी विधिवत पूजा करून या कामाचा शुभांरभ करण्यात आला. यावेळी कंत्राटदार व सिडकोचे मुख्य अभियंता संजय चौधरीदेखील उपस्थित होते.

टेकडीवरील स्फोटासंदर्भातील सर्व परवानगी घेण्यात आल्या असून सुरुंग पेरणीच्या कामामुळे  टेकडीवरील स्फोटाचे काम आणखी चार दिवस लांबणीवर पडले होते. मात्र गुरुवारी टेकडीवरील दगडांमध्ये सुरुंग पाडण्याचे काम विधिवत सुरू करण्यात आल्याने उद्यापासून टेकडी सपाटीकरणाच्या कामाला सुरूवात होणार आहे.

प्राचीन गुफा नामशेष

या टेकडीवर काही प्राचीन गुंफा असल्याचे इतिहासकारांचे मत आहे. त्या या स्फोटात नेस्तनाबूत होणार आहेत. मात्र केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून या गुफांमध्ये पुरातत्त्व मूल्य नसल्याचे प्रमाणपत्र सिडकोने घेतले असल्यामुळे तेथे स्फोटाची परवानगी दिली आहे.

विमानतळपूर्व कामे

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. यात उलवा टेकडीची उंची कमी करणे, गाढी नदीचा प्रवाह बदलणे, उच्च दाबांचे स्थलांतर आणि सपाटीकरण ही विमानतळपूर्व कामे सिडकोच्या वतीने केली जाणार आहेत. जवळपास दोन हजार कोटी रुपयांची ही कामे चार कंत्राटदारांना विभागून दिली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 1:46 am

Web Title: ulwe hill navi mumbai airport work
Next Stories
1 महावितरणचे २५ कोटी पाण्यात
2 सिडको वसाहतीतील झाडांच्या छाटणीला विलंब
3 फुटबॉल सरावात सिडकोचा खो
Just Now!
X