उरण तालुक्यातील वाढत्या औद्योगिकीकरणात व बंदरातील रसायनिक पदार्थाच्या हाताळणीत वाढ झालेली असल्याने या रसायनाच्या उग्र वासाचा परिणाम येथील नागरिकांच्या शरीरावर होऊ लागला असून कॅन्सरसारखे असाध्य आजार जडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे औद्योगिकीकरणासाठी मातीच्या भरावांच्या कामाच्या वाहनांतील धुलिकणांमुळे अनेकांना श्वसनाचे आजार जडले आहेत. त्यामुळे उरणमधील नागरिकांवर नाक मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आलेली आहे. उरणमधील हवेतील वाढते धुलिकण व ज्वलनशील रासायनिक पदार्थाच्या उग्र वासामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे.

रायगड जिल्ह्य़ातील सर्वात अधिक औद्योगिक व रासायनिक कारखाने व प्रकल्प तालुक्यात आहेत. मुंबईच्या समुद्रातील तेल विहिरीवर आधारित ओएनजीसीचा तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे. त्यातून नाफ्त्यासारख्या अतिज्वलनशील व उग्र वासाच्या पदार्थाची साठवणूक केली जाते. ओएनजीसीच्या प्रकल्पातूनच दररोज अनावश्यक वायू जाळला जात असल्याने त्याच्या धुरामुळे उरण परिसरावर अनेकदा काळ्या ढगांचे साम्राज्य पसरलेले असते. मात्र ओएनजीसीमधून निघणारा धूर प्रदूषण मुक्त असल्याचेही सांगितले जाते. अनेकदा या परिसरात एलपीजी या घरगुती वापराच्या वायूचा मोठय़ा प्रमाणात दरवळ पसरण्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरणही निर्माण होते. या संदर्भात वारंवार या परिसरातील ग्रामपंचायतीच्या वतीने तक्रारीही करण्यात आलेल्या आहेत. तर जेएनपीटी बंदरातूनही विविध प्रकारच्या रसायनांची बोटीतून आयात केली जाते. ही रसायने जेएनपीटी बंदराशेजारीच असलेल्या साठवणूक टाक्यात ठेवण्यात येतात. त्यामुळे या परिसरात रसायनांच्या उग्र वासाचा परिणाम परिसरात काम करणाऱ्या कामगार तसेच येथील नागरिकांवरही होत आहे. नुकताच धुतूम येथील तेलसाठा करणाऱ्या कंपनीतून नाफ्ता या उग्र पदार्थाची गळती झाली होती त्या वेळी कंपनीच्या बाहेर असलेल्या एका स्थानिक तरुणाला श्वसनाचा त्रास झाल्याने त्याच्यावर उपचार करण्याची वेळ आली होती. सध्या अनेक ठिकाणी मातीचे भराव सुरू आहेत.

या वाहनांतून क्षमतेपेक्षा अधिक वाहनांची ये-जा होत असल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरते आणि याचा त्रास सार्वजनिक तसेच खाजगी वाहनातून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना दररोज सहन करावा लागत आहे. वाहतुकीमुळेही हवेतील प्रदूषणात वाढ होत असून वाहतूक विभागाच्या नियमानुसार अशा वाहनांवर झाकण टाकणे आवश्यक असते. तर नियम न पाळताच वाहतूक होत असल्याने प्रदूषणात वाढ होऊ लागली आहे.

प्रदूषणाचा आलेख चढता असला तरी या परिसरात विभागाकडून प्रदूषण मोजणारी यंत्रणा बसविण्यात आलेली नाही, असे सूत्रांनी सांगितले.

उरण परिसरात ओएनजीसीने प्रदूषण मोजण्याची यंत्रणा बसविलेली आहे. तर परिसरातील प्रदूषणाची नोंद घेतली जात असून त्याचा अहवाल आला नसल्याची माहिती नवी मुंबई विभागाच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी तानाजी यादव यांनी दिली.