उरण नगरपालिकेच्या राजीव गांधी टाउन हॉलमध्ये असलेल्या मीनाताई ठाकरे वाचनालयाच्या शौचालयाचे पाइप फुटले असून या पाइपमधून शौचालयातील मल वाचनालयाच्या परिसरातच पसरून दरुगधी निर्माण झाल्याने वाचनालयात येणाऱ्या वाचकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे वाचनालयाशेजारीच इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय आहे. या रुग्णालयातील रुग्णांवरही या दरुगधीचा परिणाम होत आहे. त्यामुळे नगरपालिकेने लवकरात लवकर शौचालयाची दुरुस्ती करून बाहेर पडणारे मल थांबविण्याची मागणी वाचकांकडून केली जात आहे.

सगळीकडे स्वच्छतेची मोहीम राबविली जात असताना नगरपालिकेच्या नाकाखाली असलेल्या पालिकेच्या वाचनालयातील शौचातील घाण उघडय़ावर पडून दरुगधी पसरली आहे. याकडे मात्र नगरपालिकेचे दुर्लक्ष आहे. वाचनालयाची उभारणी १९९७ साली करण्यात आलेली आहे.मागील पंधरा वर्षांत वाचनालयाच्या इमारतीचीही दुरवस्था झाली असून लाद्या, छत यांना गळती लागली आहे.

छताच्या गळतीमुळे वाचनालयात अपघाताचाही धोका निर्माण झाला आहे. तर वाचनालयात येणाऱ्या वाचकांना तसेच पुस्तक घेण्यासाठी येणाऱ्यां सदस्यांना स्वच्छतागृहाची सोय असली तरी स्वच्छतागृहाच्या खिडक्यांच्या काचा फुटलेल्या असून त्या उघडय़ा आहेत. तसेच येथील नळ व बेसिन यांची स्थितीही दयनीय झाली आहे.

नळाचे पाणी सातत्याने वाहत असल्याने शौचालयात चिखल होत आहे. त्याचप्रमाणे शौचालयाचे दरवाजेही तुटलेले आहेत. या समस्या दूर करण्याची मागणी उरणमधील वाचनालयाचे वाचक रवींद्र पाटील यांनी केली आहे.

नुकत्याच वाचनालयावरील मजल्यावरून पडलेल्या खिडकीमुळे सुदैवाने अपघात टळला. या संदर्भात उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद डवले यांच्याशी संपर्क साधला असता वाचनालयाच्या शौचालयाच्या दुरुस्तीचे काम त्वरित करण्यात येईल, तसेच वाचनालयाची डागडुजी करण्याचा प्रयत्न करू अशी माहीती या वेळी बोलताना त्यांनी दिली.