|| शेखर हंप्रस

लसीकरणानंतर २८ दिवस रक्तदान करण्यास मनाई; दात्यांचे प्रमाण घटल्यास रक्ततुटवडा भासण्याची चिन्हे

नवी मुंबई : केंद्र सरकारने येत्या एक मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणास परवानगी दिल्यामुळे करोना प्रतिबंधात्मक लढाईला बळ मिळणार आहे. मात्र, त्याच वेळी ही मोहीम रक्तदानाचा यज्ञ मात्र विस्कळीत करण्याची भीती आहे. लस घेतल्यानंतर किमान २८ दिवस रक्तदान करण्यात वैद्यकीय नियमानुसार मनाई करण्यात आली आहे. एक मेपासून लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर रक्तदात्यांमध्ये लक्षणीय घट होण्याची शक्यता असून त्यामुळे राज्यातच नव्हे तर देशभर रक्ततुटवड्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

डायलिसिस, रक्ताचा कर्करोग, विविध प्रकारच्या शेकडो शस्त्रक्रिया, अपघातातील गंभीर जखमी अशा रुग्णांसाठी दररोज मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज लागते. मात्र, गेल्या वर्षभरापासून करोनामुळे रक्तदान करण्यास पुढे येण्यास अनेक जण धजावत नाहीत. परिणामी गेल्या वर्षभरापासून मुंबईसह राज्यभर रक्ताचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. काही आठवड्यांपूर्वी राज्यात जेमतेम सहा-सात दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध होता. त्यानंतर राज्यभर रक्तदान शिबिरे राबवून ही परिस्थिती सुधारण्यास हातभार लावण्यात आला. मात्र, आणखी मोठ्या प्रमाणात रक्तदान होण्याची गरज व्यक्त होत आहे. अशातच येत्या एक मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणास परवानगी देण्यात आल्यामुळे रक्तसंकलन मोहिमेत अडथळे निर्माण होण्याची भीती आहे.

राष्ट्रीय रक्तसंक्रमण परिषदेने गेल्याच महिन्यात काढलेल्या एका सूचनेनुसार, करोना प्रतिबंधक लशीचा डोस घेतल्यानंतर २८ दिवस रक्तदान करता येणार नाही. सध्या चार ते सहा आठवडे या अंतराने लशीची दुसरी मात्रा दिली जात आहे. त्यामुळे लसीकरण झालेली एक व्यक्ती साधारण दोन-अडीच महिने रक्तदान करू शकणार नाही. साहजिकच याचा परिणाम रक्तसंकलन प्रक्रियेवर होणार आहे.

 

लशीचा पहिला डोस घेतल्यावर २८ दिवस आणि दुसरा डोस घेतल्यावर २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्याचा प्रतिकारशक्तीवर परिमाण होण्याची शक्यता असल्याने हा नियम करण्यात आला आहे. – डॉ. प्रशांत जवादे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, वाशी मनपा रुग्णालय

नवी मुंबईत अल्प प्रतिसाद  सध्या करोनामुळे रक्तदान शिबिरांना

जणू पायबंद बसला आहे. नवी मुंबईत मागील एक महिन्यात चार ते पाच रक्तदान शिबिरे घेण्यात आली, त्यात जेथे किमान २०० बाटल्या रक्त अपेक्षित होते तेथे ५० बाटल्या गोळा झाल्या. तर दोन रक्तदान शिबिरांत ७ बाटल्याच जमा झाल्या. एवढी विदारक परिस्थिती नवी मुंबईत निर्माण झाली आहे.

शेकडो लोक आहेत जे नियमित रक्तदान करतात. अशा रक्तदात्यांना इतर रोगांच्या रुग्णांचा विचार करून लस देण्यात प्राधान्यक्रम दिला असता तर एवढा मोठा रक्ततुटवडा जाणवला नसता. याबाबत लसीकरण सुरू होण्यापूर्वी या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांनी संबंधित विभागांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुचवले होते, मात्र अपेक्षित निर्णय झाला नाही. – प्रसाद अग्निहोत्री, रुग्णसेवक

 

नवी मुंबईत प्रत्येक रुग्णालयाला कमी-अधिक प्रमाणात रक्ताची गरज असतेच. कर्करोगावर उपचार जेथे केले जातात तेथे त्यांना जास्त रक्ताची गरज पडते. करोनामुळे रक्तदाते खूप मोठ्या प्रमाणात घटल्याने रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. – नितीन तांबे, रक्तपेढी व्यवस्थापक