नवी मुंबई : करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने दर गुरुवारी व रविवारी ३१ मार्चपर्यंत भाजीपाला व फळ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी बाजार बंद असल्याने शुक्रवारी भाजीपाल्याच्या ९७० गाडय़ांची आवक झाली. त्यामुळे भाजीपाल्याचे दर ४० टक्कय़ांनी कमी झाले आहेत.

बाजाराला सुट्टी असल्याने तसेच पुणे व इतर स्थानिक बाजारपेठा बंद असल्याने वाशीतील भाजीपाला बाजारात आवक वाढली आहे. इतर वेळी ५०० ते ५५० गाडय़ांची आवक होते. आज ९७० गाडय़ांची म्हणजे दुप्पट आवक झाली. त्यात ग्राहक देखील कमी झाले आहेत. त्यामुळे भाजीपाल्यांचे दर एकदम ४० टक्क्यांनी उतरले. कोबी, फ्लावर व टोमॅटोचे दर स्थिर आहेत. मात्र भेंडी, गवार, वाटाणा, गाजर यांचे कमी झाले. भेंडी प्रतिकिलो ३६ रुपयांवरून २८ ते ३० रुपयांवर, गवार ४० ते  ४४ वरून ३६ रुपये, हिरवा वाटाणा २८ रुपयांवरून २४ ते २६ रुपये आणि गाजर १२ रुपयांवरून ८ ते  १० रुपये प्रतिकिलो झाले आहेत.

गुरुवारी भाजीपाला बाजार बंद होता. पुणे तसेच स्थानिक बाजारपेठ बंद असल्याने बाजारात मोठय़ा प्रमाणात आवक झाल्याचे घाऊक व्यापारी कैलास तांजणे यांनी सांगितले.