तीन टाकी चौकात प्रवाशांची गैरसोय; रेल्वे स्थानकांवर रिक्षांकडून अडवणूक

नवी मुंबई या सुनियोजित शहरात प्रवाशी वाहनांच्या बेशिस्तपणामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.

कोपरखैरणे येथील तीन टाकी चौकात मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ‘बेस्ट’ आणि ‘एनएमएमटी’च्या बस या चौकात थांब्यावर उभ्या राहत नाहीत. बेशिस्तपणे कुठेही उभ्या केल्या जातात. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होते. प्रवाशांचीही बस पकडण्यासाठी तारांबळ उडते. बसबरोबर रिक्षा आणि दुचाकीस्वारांचीही यात भर पडत आहे.

शेअर रिक्षांची प्रवासी घेण्यासाठी स्पर्धा सुरू असते. रिक्षा बस थांब्यावर उभ्या राहत असल्यामुळे बस मागे पुढे कुठेही उभ्या राहतात. त्यामुळे बस पकडण्यासाठी प्रवाशांची पळापळ सुरू असते.

तोपर्यंत बस निघून जाते..

सकाळी आणि संध्याकाळी अतिशय बेशिस्तपणे रिक्षा आणि बस या ठिकाणी उभ्या असतात. त्यामुळे बस थांब्यावर उभ्या राहत नाहीत. मागे पुढे बस पकडण्यासाठी धावत जाईपर्यंत बस निघून जाते. हात दाखवला तरी बस थांबत नाहीत, असे प्रवासी अंजली तिडके यांनी सांगितले.

रिक्षाचालकांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येत. मात्र जर इतर वाहनांमुळे येथे वाहतुकीवर परिणाम होत असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. -उमेश मुंडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग

चारही दिशेने रिक्षांचा ‘ठिय्या’

नवी मुंबईत रिक्षाचालकांच्या मनमानीचा फटका प्रवाशांना बसत आहे. कधी भाडे नाकारणे तर कधी सरसकट भाडे आकारणे याच्या तक्रारी वाढत आहेत. तसेच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची अडवणूक होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. कोपरखैरणे, घणसोली, वाशी रेल्वे स्थानक परिसरात हा प्रकार सुरू आहे. कोपरखैरणे रेल्वे स्थानकालगतचा रस्ता हा घणसोली, बोनकोडे, वाशी या विभागांना जोडला गेला आहे. यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहनांसह नागरिकांची वर्दळ असते. या स्थानक परिसरात चारही दिशेने रिक्षाचालक रिक्षा उभ्या करीत आहेत. यामुळे वाहतूक कोंडी तर होतेच शिवाय प्रवाशांना वाट काढताना नकोसे होते. रिक्षा कुठेही अस्ताव्यस्त उभ्या असतात. स्थानकातून प्रवासी बाहेर येतात रिक्षाचालकांकडून त्यांची कोंडी होत असते.