मंदा म्हात्रे, भाजप बेलापूर मतदारसंघ

निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले गणेश नाईक हे मोठे नेते आहेत. पण भाजपमध्ये पक्षशिस्तीला महत्त्व आहे. त्यामुळे यापुढील काळात नवी मुंबईचे राजकारण एकाच व्यक्तीभोवती फिरणार नाही, असे स्पष्ट मत बेलापूरच्या विद्यमान आमदार आणि शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. एकाच घरात अनेक लोक आनंदाने नांदतात, असे सांगतानाच गणेश नाईक यांच्याशी मनोमीलन होणे, कदापी शक्य नाही, असे सांगत मंदा म्हात्रे यांनी येणाऱ्या काळातील नवी मुंबईतील राजकीय संघर्षांची दिशाही दाखवून दिली.

बेलापूरच्या जागेवर भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या नेत्यांप्रमाणे शिवसेनेचेही लक्ष होते. मात्र, अखेरीस उमेदवारी तुम्हालाच मिळाली..

‘तुम्ही शांत बसा’ असे सांगून मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला होता. तो सल्ला मी पाळला. मला तिकीट मिळू नये, यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मला दिलेला शब्द पाळला. पक्ष आणि शहरासाठी केलेल्या विकासात्मक कामांची दखल घेऊन मला पुन्हा संधी दिली.

 महायुती असली तरी शिवसेनेत तुमच्या उमेदवारीबद्दल नाराजी होती?

शिवसेनेत माझ्याबद्दल नाराजी नाही. काही जणांनी तसा प्रयत्न केला. परंतु, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नवी मुंबईतील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी माझ्यासोबत आहेत. आम्ही एकजुटीने काम करत आहोत.

 गणेश नाईक आणि तुम्ही एकाच पक्षात आहात. परंतु, प्रचारात एकत्र दिसलाच नाहीत. भाजपमध्ये दोन गट निर्माण झालेत?

मी माझा बेलापूरचा किल्ला जिंकण्यासाठी नेटाने आणि जोमाने लढत आहे. ते त्यांच्या मतदारसंघात प्रचार करीत आहेत.

नवी मुंबईचे राजकारण गणेश नाईक यांच्याभोवतीच फिरत राहणार का?

राजकारणात कोणी एकटाच मोठा नसतो. नवी मुंबईचे पुढील राजकारण एक व्यक्तीभोवती कदापिही एकवटले जाणार नाही. भाजपची पक्षशिस्त वेगळी आहे. गणेश नाईक हे मोठे नेते आहेत. ते त्यांचे काम करत आहेत. मी माझे काम करणार आहे.

नवी मुंबईत ‘ताई’ आणि ‘दादा’ यांचे मनोमीलन होणार का?

नवी मुंबईच्या विकासासाठी मी अहोरात्र मेहनत घेत असून शहराच्या सर्वागीण विकासासाठी मी सदैव तयार आहे. परंतु, मनोमीलन होणे शक्य नाही. एकाच घरात अनेकजण आनंदाने राहतात. त्याप्रमाणे मी माझे काम करत राहणार. त्यांनी शहरासाठी त्यांच्यापरीने काम करावे.

 येत्या काही महिन्यांत पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्या वेळी नवी मुंबई भाजपमधील निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका कोणाची ठरणार?

– महापालिकेचे मुख्यालय बेलापूर मतदारसंघात आहे. पालिका निवडणूक प्रक्रिया आणि निर्णयात माझी भूमिका निर्णायक असेल.

 मुख्यमंत्री तुमच्या प्रचारफेरीत आले नाहीत..

मी लढण्यासाठी सक्षम आहे, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. त्यामुळे त्यांनी घरी येऊन सर्वाशी चर्चा केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सभा घेतली. पक्षाने मला विचारणा केली तेव्हा मी ‘लढण्यासाठी खंबीर आहे’ असे सांगितले होते.

नवी मुंबईच्या विकासात तुमचे व्हिजन काय?

– नवी मुंबई शहराला मला सिंगापूर करायचे नाही. उलट त्याला स्वत:चे वेगळे महत्त्व प्राप्त करून द्यायचे आहे. शहरात आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होणार आहे. या विमानतळाला साजेशी पाच पर्यटनस्थळे निर्माण करायची आहेत. झोपडपट्टीमुक्त नवी मुंबई, वाहतुकीसाठी प्रभावी दळणवळण साधने, ३ एकर जागेवर तरुणांच्या हाताला काम मिळवून देणारे भव्य प्रशिक्षण केंद्र, कलेच्या जोपासनेसाठी व विकासासाठी आर्ट अकॅडमी  शहराचा नियोजनबद्ध पुनर्विकास,पार्किंगबाबत धोरणात्मक उपाययोजना हे माझ्यापुढील उद्दिष्ट आहे.

(मुलाखत -विकास महाडीक व संतोष जाधव)