उमेदवारांचा पदयात्रा, गप्पा, मेळाव्यांवर भर

प्रचारासाठी महत्त्वाचे दिवस असलेल्या शनिवार, रविवारी नवी मुंबईतील ३८ उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. प्रचारासाठी दिवस कमी मिळाल्याने उमेदवारांनी रोड शो आणि पदयात्रा यांच्यावरच भर दिला आहे.

राज्यात विधानसभा निवडणूकीचे मतदान एकाच दिवशी होणार असल्याने प्रचारासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांना कमी कालावधी मिळाला आहे. शिवसेना-भाजप युतीतील मनोमीलन न झाल्याचे उमेदवारी जाहीर होण्यासाठी ऑक्टोबर उजाडला. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरल्यापासून युतीच्या उमेदवारांना केवळ १८ दिवस मिळाले. प्रस्थापित उमेदवारांनी नवरात्रोत्सवातील आठ दिवसांचा देखील प्रचारासाठी उपयोग केला. त्यानंतरच्या बारा दिवसांत उमेदवारांची तारांबळ उडाली आहे. सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पाऊस येत असल्याने प्रचारात अडथळे येत आहेत. त्यामुळे आता सर्व मदार शनिवार रविवारी असलेल्या सुटीच्या दिवशी प्रचारावर भर देणार आहेत.

प्रचारासाठी तयार करण्यात आलेली विशेष वाहन या भागात फिरु शकणार नसल्याने (अंर्तगत रस्ते नसल्याने) पदयात्रांवर नाईकांचा भर राहणार आहे. रविवारी नाईक कोपरखैरणे भागात तळ ठोकून  आहेत. नाईकांचे माजी आमदार पुत्र संदीप नाईक यांना याच भागातून दोन वेळा मतधिक्य मिळालेले आहे. त्यामुळे नाईक या भागावर जास्त लक्ष असेल. या भागात माथाडी कामगारांची संख्या जास्त असून यातील जास्तीत जास्त कामगार आता माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या सोबत भाजप मध्ये समरस झालेला आहे. त्यामुळे या भागात नाईकांबरोबर पाटील प्रचारासाठी अग्रस्थानी राहणार आहेत. नाईकांचे प्रतिस्पर्धी माथाडी नेते गणेश शिंदे यांनी रविवारी वाशी येथील शिवाजी चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन रोड शो करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी छोटय़ा चौक सभांवर  भर देण्यात आला असून रविवारी दिघापर्यंत रोड शो असेल.  तर सोमवारपासून एपीएमसी बाजारातील पाचही घाऊक बाजारातील मतदाराला साकडे घालणार आहेत. या दोघांच्या लढतीत मनसेचे निलेश बाणखेले यांनी सुटीच्या दिवशी अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे.

बेलापूर मतदार संघातील विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांच्या सध्या नाईकांबरोबर पक्षात आलेल्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेण्यावर जास्त भर आहे. शनिवारी सकाळी अग्रोली ते तुर्भे अशी प्रचार फेरी आखण्यात आली आहे. ही प्रचार रॅली नेरुळ, शिरवणे, तुर्भे असा प्रवास करणार असून रविवारी सीवूड्सपासून सुरू होणारी ही रॅली पामबीच मार्गे वाशीत प्रचार करणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळीच मतदाराच्या दारी

दुसरा शनिवार असल्याने बहुतांशी शासकीय, निमशासकीय व काही खासगी कार्यालयांना सुट्टी आहे. त्यामुळे उमेदवारांनी सकाळी नऊ वाजल्यापासून प्रचाराची योजना आखली आहे. यात सकाळी चालण्यास येणाऱ्या मतदारांपासून रात्री शतपावली करणाऱ्या मतदारांपर्यंत संर्पक साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. ऐरोली मतदार संघात एकूण ११ उमेदवार निवडणूक रिंगणात असून यातील शिवसेना भाजपा युतीचे माजी मंत्री गणेश नाईक, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे गणेश शिंदे आणि मनसेचे निलेश बाणखेले हे तीनच उमेदवार लक्षवेधी आहेत.