सीवूड्समधील पदपथ धोकादायक; विजेचा लपंडाव

सीवूड्स सेक्टर ४८ येथील नवरत्न हॉटेल ते डीएव्ही शाळेच्या परिसरातील पदपथांचा आकार कमी करण्यात आला आहे. हे काम करताना पथदिव्यांच्या खांबांची मोडतोड झाली असून त्यांच्या वीजतारा उघडय़ाच ठेवण्यात आल्या आहेत. या कामामुळे निर्माण झालेला राडारोडाही पदपथावरच टाकण्यात आला आहे. त्यामुळे चालण्यासाठी जागाच उरलेली नाही. पदपथापुढे वाहने उभी करण्यात येतात आणि त्यापुढे थेट रहदारी सुरू होते. त्यामुळे या परिसरातील पदपथ गैरसोयीचे आणि धोकादायक ठरत आहेत.

सीवूड्स सेक्टर ४८ मध्ये पदपथ, गटारे, वीजव्यवस्था यांची कामे सुरू आहेत. त्यात नियोजनाचा अभाव आहे. येथून अनेक विद्यार्थी रोज ये-जा करतात. त्यामुळे विजेचा धक्का बसून किंवा रस्त्यावरून चालताना वाहनांचा धक्का लागून दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

डीएव्ही शाळेपासून नवरत्न हॉटेलच्या परिसरात पदपथावर कामातले डेब्रिज, पथदिव्यांचे खांब, वीजतारा उघडय़ाच पडल्या आहेत. रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. हे काम नियोजनबद्धरीत्या आणि वेगाने करण्यात यावे, अशी मागणी रहिवासी आणि पालक करत आहेत.

‘पदपथ कमी करण्यात आला, परंतु आता रुंद झालेल्या रस्त्यावर वाहने उभी केली जात आहेत. पदपथावर फेरीवाले बसू लागले आहेत. पालिकेने याबाबत योग्य ती कारवाई करावी,’ अशी मागणी रमेश जाधव या रहिवाशाने केली. मनसेने पालिकेच्या विद्युत विभागालाही निवेदन दिले आहे. ‘विद्युत विभागातील अधिकाऱ्यांसह कामाची पाहणी केली होती.पालिकेने तात्काळ या विभागातील कामे पूर्ण करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात,’ अशी मागणी मनसेचे सचिन कदम यांनी केली आहे.

पालिकेच्या स्थापत्य आणि विद्युत विभागाने पथदिव्यांचे काम सुरू केले आहे. उघडय़ा पथदिव्यांच्या वीजतारांमधील वीजप्रवाह पूर्णत: खंडित करण्यात आला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी तात्पुरती प्रकाशव्यवस्था करण्यात आली आहे. काही दिवसांतच येथील काम पूर्ण करण्यात येईल.

– सुनील लाड, कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग, परिमंडळ-१

पालिकेची या विभागात सुमारे ३ कोटी १० लाखांची कामे सुरू आहेत. लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. रस्त्याचे कामही करण्यात येणार आहे.

– पंढरीनाथ चवडे, अभियंता, नवी मुंबई महापालिका

विभागात पालिकेचे काम सुरू असून लवकरात लवकर येथील रस्त्याची कामे करण्याची आवश्यकता आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता आहे. पदपथही धोकादायक ठरत आहेत.

– हितेश तुपे, स्थानिक नागरिक

विजेचा लपंडाव सुरू

सीवूड्स विभागात रात्रीच्या वेळी वीज जात आहे. तांत्रिक अडचण आली आहे. ती नेमकी काय आहे हे शोधून विभागातील वीज समस्या दूर करण्यात येईल, असे नेरुळमधील महावितरणचे कार्यकारी अभियंता एस. पी. गायकवाड यांनी दिली.