|| सीमा भोईर

पुरेसे पाणी येत नसल्याने पर्जन्यजल साठवण्याची पनवेलकरांवर वेळ

पनवेलला पाणीपुरवठा करणारे गाढेश्वर धरण २६ जूनला भरून वाहू लागल्यामुळे आता पाणीटंचाईतून सुटका होणार, या आशेवर असलेल्या पनवेलकरांचा पुरता हिरमोड झाला आहे. धरण भरले, तरीही पनवेल व नवीन पनवेलमधील रहिवाशांना अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर पावसाचे पाणी साठवून ते वापरण्याची वेळ आली आहे.

उन्हाळ्यात पनवेलकरांना एक, दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यावेळी पाणी साठवून ठेवणे आणि काटकसरीने वापर करणे ही पनवेलकरांसाठी एक वेगळीच डोकेदुखी बनली होती. गाढेश्वर धरण आटल्यामुळे ही स्थिती उद्भवली होती. गेल्या तीन आठवडय़ांत पनवेलमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे हे धरण सध्या दुथडी भरून वाहत आहे, तरीही पनवेलकरांची अनियमित पाणीपुरवठय़ाच्या दुष्टचक्रातून सुटका झालेली नाही.

या धरणातून पनवेल शहराला दररोज १२ एमएलडी पाणीपुरवठा होतो. हा पाणीपुरवठा नियमित सुरू करणार असल्याचे पनवेल महानगरपालिकेने जाहीर केले होते, मात्र तसे झालेले नाही. पाण्याच्या वेळा टळून गेल्या तरी पाणी येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पाणीपट्टी नियमित वसूल केली जाते, शिवाय धरणही पूर्ण भरले आहे, असे असताना अनियमित पाणीपुरवठा का, असा प्रश्न रहिवासी करत आहेत. ही टंचाई नेमकी कोणाच्या पथ्यावर पडत आहे, असा प्रश्नही विचारला जात आहे.

पनवेलमध्ये तीन दिवसांपासून पाणी नाही, त्यामुळे आम्ही पावसाचे पाणी साठवून दैनंदिन कामे करत आहोत. एका तासाऐवजी केवळ अर्धाच तास पाणी सोडले जात आहे. जोरदार पाऊस पडूनही पनवेलमध्ये काही भागात पाण्याचे टँकर मागविले जात आहेत. यात काही राजकीय हितसंबंध गुंतले आहेत का?, असा प्रश्न पनवेलचे रहिवासी अविनाश जगन्नाथ यांनी केला.

पनवेल महापालिकेच्या हद्दीत दररोज पाणीपुरवठा होत आहे. जलवाहिनी खराब झाली की ती दुरुस्त करण्यासाठी पाणीपुरवठा खंडित केला जातो. जुने पनवेल शहर सोडले तर  परिसराला सिडकोमार्फत पाणीपुरवठा होतो, तो पाताळगंगा नदीपात्रातूनही पाणीपुरवठा केला जातो. पावसाळ्यात तेथील वीजपुरवठा अनेकदा खंडित होतो, त्यामुळे पाणीपुरवठा करणे शक्य नसते.    – सुधीर साळुंखे, वरिष्ठ अभियंता, पनवेल पालिका