पुरेसे पाणी असल्याचा सरपंचांचा दावा

घारापुरी बेटावर राहणाऱ्या ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदन शिवसेनेकडून देण्यात आलेले आहे. त्यांनी घारापुरीतील पाणीटंचाईची समस्या सोडविण्याची मागणी प्रभारी नायब तहसीलदारांकडे केली आहे. तर घारापुरीत असलेल्या विहिरी व हातपंपांना पाणी असून पाणी टंचाई नसल्याचा दावा घारापुरी ग्रामपंचायतीच्या सरपंचानी केला आहे.

जगातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या व दररोज हजारो पर्यटकांचा राबता असणाऱ्या उरण तालुक्यातील घारापुरी बेटावर शेतबंदर, मोरा बंदर व राज बंदर अशी तीन गावे आहेत. या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी २००८ मध्ये बेटावर एक ४ कोटी लीटर क्षमता असलेले धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणातून तीनही गावांना जलवाहिनी टाकून नळाने पाणीपुरवठा केला जातो. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे धरणातून होणारा पाणीपुरवठा बंद पडला आहे. त्यामुळे घारापुरीमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असल्याचा दावा करीत शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य बळीराम ठाकूर यांनी उरणच्या प्रभारी नायब तहसीलदार योगिता कोल्हे यांना निवेदन दिले आहे. यामध्ये बेटावरील गावात असलेल्या विहिरींची सफाई होत नसल्याने पाणी पिण्या योग्य नसल्याचे म्हटले आहे. या संदर्भात घारापुरी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेंद्र पडते यांच्याशी संपर्क साधला असता घारापुरीतील धरणातील पाणी बंद झाल्याचे मान्य केले. मात्र घारापुरीतील तीनही गावात असलेल्या विहिरींना प्रचंड पाणी असून या गावात असलेल्या हातपंपांनाही पाणी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच अशा प्रकारे पाणीटंचाईचा प्रचार झाल्याने घारापुरी बेटावर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर त्याचा परिणाम होत असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच घारापुरीत पाणीटंचाई असल्याची कोणतीही सूचना पंचायत समितीकडे आली नसल्याची माहिती उरणचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे यांनी दिली.