नाव न घेता आयुक्तांवर आगपाखड; महापौर म्हणून कार्यक्षम वाटत नसल्याचे वक्तव्य

पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वासाचा ठराव मंजूर करून दोन माहिने उलटले, त्यांची बदली व्हावी यासाठी तीन वेळा मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेतल्या, पालकमंत्र्यांच्या दरबारात अनेकदा हजेरी लावून झाली तरीही मुंढे यांची बदली होत नसल्याने महापौर सुधाकर सोनावणे यांचा संयम सुटल्याचे चित्र रविवारी झालेल्या पालिकेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात दिसले. ‘मी या शहराचा बारावा महापौर आहे. १२ हा आकडाच कमनशिबी आहे. माझ्याच नशिबात हा आकडा का आला? मी महापौर म्हणून किती काळ काम पाहणार माहीत नाही,’ असे निराशाजनक भाषण सोनावणे यांनी केले. त्यामुळे महापौर राजीनामा देणार असल्याचीही चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.

[jwplayer p9DkL1SW]

नवी मुंबई पालिकेच्या स्थापनेला रविवारी २५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त वाशी येथील भावे नाटय़गृहात दरवर्षीप्रमाणे वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी व्यासपीठावर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, महापौर सुधाकर सोनावणे आणि आयुक्त तुकाराम मुंढे व सर्व समित्यांचे सभापती होते. सर्व मान्यवरांची शुभेच्छापर भाषणे झाल्यानंतर महापौरांचे नकारात्मक भाषण झाले. त्यांच्या भाषणात उपाहास, टीका, अवसान गळल्याचे हावभाव आणि नकारात्मकता होती. पालिकेने केलेली आतापर्यंतची कामे ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बळावर झाली, त्यांना जे रद्दी, गाळ समजत असतील त्या अधिकाऱ्यांना बदलण्याची आवश्यकता आहे, असे मत या वेळी सोनावणे यांनी व्यक्त केले. त्यासाठी आई-वडिलांचे अर्थहीन उदाहरण देण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला. मुले फार शौकिन होतात तेव्हा त्यांना आई-वडील बदलण्याचीही गरज वाटते, असे ते म्हणाले. त्यांचे हे वक्तव्य ऐकून उपस्थित अवाक् झाले.

पालिकेने दाखविलेल्या दूरदृष्टीमुळेच मोरबे धरण विकत घेता आले. अन्यत: असे धरण आतापर्यंत कधीच विकत घेता आले नसते, असा दावा महापौरांनी केला. मी नगरसेवक म्हणून चांगले काम केले पण महापौर म्हणून मला कार्यक्षम असल्यासारखे वाटत नाही, अशी टीका त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या असता, त्यावर सोनावणे यांनी रोष व्यक्त केला. जास्त टाळ्या वाजवायच्या नाहीत, असे ते म्हणाले.

महापौरांच्या अशा निराशाजनक भाषणामुळे इतके सारे करूनही आयुक्तांची बदली होत नसल्याने ते राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.

राजकारणात पीएच.डी. मिळाल्यासारखे वाटते!

पालिकेत सध्या लोकप्रतिनिधी व प्रशासनामध्ये कलगीतुरा सुरू आहे. गेल्या ४० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत जे शिकता आले नाही तेवढे केवळ दीड वर्षांत शिकल्याने राजकरणाची आता पीएच.डी. मिळाल्यासारखे वाटत असल्याचे उपहासात्मक वक्तव्य त्यांनी केले. मी शनीकडे जाणार नाही असे सांगून आनंदाने जगण्याची सवय लावली तर दु:ख होत नसल्याचे ज्ञानामृत पाजून महापौरांनी भाषण आटोपते घेतले. त्या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी आजच्या आनंदाच्या दिवशी असे भाषण करू नका, असे जाहीरपणे व्यासपीठावरून सांगितले.

[jwplayer UUZQ3PNu]