नेरुळ पालिका रुग्णालयातील प्रकार

काही दिवस बंद असलेल्या नेरुळ येथील पालिका रुग्णालयातील प्रसूती विभाग दोन स्त्री रोगतज्ज्ञ मिळाल्यानंतर पूर्ण क्षमतेने सुरू राहील असा दावा करण्यात आला होता. मात्र तरीही हा विभाग कधी सुरू तर कधी बंद असतो. त्यामुळे गरोदर महिलांची अडचण होत आहे.

नवी मुंबई महापालिकेने करोडो रुपये खर्च करून नेरूळ व ऐरोली येथील माता बाल रुग्णालयांची सार्वजनिक रुग्णालये केली. टोलेजंग इमारती बांधल्या आहेत. मात्र अधिकारी, कर्मचारी नसल्याने पूर्ण क्षमतेने आरोग्यसेवा मिळताना दिसत नाहीत. नेरुळ येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे सार्वजनिक रुग्णालयात प्रसूती विभागात महिनाभरापूर्वीपासून स्त्रीरोगतज्ज्ञच उपलब्ध नसल्याने २० दिवस बंद होता.

त्यामुळे गरोदर महिलांना वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात किंवा नेरुळ येथील डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात जावे लागत होते. ‘लोकसत्ता’ने वृत्त दिल्यानंतर पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नेरुळ रुग्णालयासाठी २ स्त्री रोगतज्ज्ञ उपलब्ध करून दिले. त्यामुळे प्रसूती विभाग सुरू झाला होता. त्यानंतर पालिका आयुक्तांनी डॉक्टरांचे मानधनही ५९ हजारांवरून ७५ हजार केले आहे.

असे असतानाही येथील प्रसूती विभाग कधी बंद असतो तर कधी सुरू आशा तक्रारी आहेत. रात्रीच्या वेळी गरोदर महिला रुग्णांची मोठी अडचण होते.

हा प्रसूती विभाग दिवस-रात्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी सहा स्त्रीरोगतज्ज्ञांची आवश्यकता आहे. परंतु या ठिकाणी चार स्त्रीरोगतज्ज्ञ नेमण्यात आले आहेत. दोन डॉक्टरांवर हा विभाग चोवीस तास सुरू ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे हा प्रसूती विभाग वारंवार बंदच होत आहे.

स्त्रीरोगतज्ज्ञ कमी असल्याने अडचण होती. येथे दोन स्त्रीरोगतज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली असून येथील प्रसूती सेवा सुरळीत करण्यात आली आहे. नेरुळ येथील रुग्णालयांतील हा विभाग २४ तास सुरू राहील यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

-डॉ. दयानंद कटके, आरोग्य अधिकारी