राज्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख मिळालेल्या ८० हजार लोकसंख्येच्या खारघर ग्रामपंचायतीने दिवाळीच्या मुहूर्तावर पतीचे छत्र गमावलेल्या तीनशे तीन स्थानिक महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे सहकार्य केले. खारघर ग्रामपंचायतीला वर्षांला सुमारे वीस कोटी रुपयांचा महसूल कराच्या स्वरूपात मिळत असल्याने विविध समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेतल्याची माहिती ग्रामपंचायतीमधील सदस्यांनी दिली. रविवारी झालेल्या या कार्यक्रमात तीन कोटी तीन लाख रुपयांचा निधी खर्च झाला.
खारघर ग्रामपंचायतीच्या मतदारांची संख्या ५० हजारांवर गेली आहे. खारघर गाव आणि खारघर वसाहत असा या ग्रामपंचायतीचा पसारा वाढल्याने राज्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असा किताब या पंचायतीच्या नशिबी मिळाला आहे. अनेक वर्षांपासून या पंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व आहे. या ग्रामपंचायतीने यापूर्वी आदिवासी बांधवांना घरे बांधून दिली. त्या घरांमध्ये टीव्ही, फ्रीज अशा सुखसोयी दिल्या. त्यानंतर या ग्रामपंचायतीने सप्टेंबर २०१४ पासून महिला व बाल कल्याण निधीतून दोन मुली असलेल्या घरातील त्या मुलींच्या नावावर बँकेत पाच हजार रुपयांची मुदत ठेव तसेच त्यांच्या आईच्या खुराकासाठी अडीच हजार रुपयांची रोख मदत वाटली. या योजनेसाठी वर्षांला ग्रामपंचायतीमधून पाच लाख रुपयांचे वाटप सामान्यांना होते. आजही या ग्रामपंचायतीच्या तिजोरीत सुमारे अकरा कोटी रुपये शिल्लक आहेत. यामुळेच तिजोरीत असलेल्या रकमेतून सामान्यांसाठी चांगली योजना राबवावी यासाठी ग्रामपंचायतीचे सदस्य नेहमी प्रयत्नशील असतात. या योजनेतील लाभार्थी होण्यासाठी पतीचे छत्र गमावलेल्या महिलांकडून खारघरचे रहिवासी असल्याचा पुरावा तसेच पतीच्या मृत्यूचा दाखला आणि पनवेल तहसीलदार कचेरीतून कमाल वार्षकि साठ हजार रुपये उत्पन्न असलेला दाखला असे पुरावे घेण्यात आले.