‘एपीएमसी’ला १७५ एकर जागाही अपुरी

मुंबईत जागा अपुरी पडल्याने ९० च्या दशकात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवी मुंबईत १७५ एकर जागेवर स्थलांतर झाले.

स्थलांतराची चर्चा; एक हजार एकरची गरज

नवी मुंबई : मुंबईत जागा अपुरी पडल्याने ९० च्या दशकात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवी मुंबईत १७५ एकर जागेवर स्थलांतर झाले. मात्र आता ही जागाही बाजारासाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे नव्या जागेत स्थलांतराची चर्चा सुरू झाली आहे. यासाठी एक हजार एकर जागेची गरज भासणार असून उरण परिसरात याची चाचपणी सुरू असल्याचे समजते.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी आहे. सद्य:स्थितीत एपीएमसीत स्वतंत्र अशी वाहनतळ व्यवस्था नाही, ट्रक टर्मिनच्या जागेवर सिडको गृहनिर्माण करीत आहे. त्यामुळे बाजार समितीला समस्या निर्माण होत आहेत.

मुंबईतून नवी मुंबईत बाजार समिती स्थलांतर सुरू झाल्यानंतर १९८२ मध्ये कांदा-बटाटा मार्केटच्या इमारतीची उभारणी करण्यात आली. तर सन ११९० मध्ये एपीएमसी प्रशासनाने ठेकेदार पद्धतीने भाजीपाला व फळ बाजार समितीची उभारणी केली होती. बाजार समिती सुरू झाल्यानंतर एपीएमसीत शेतमालाची आवक आता ७० ते ८० टक्कय़ांनी वाढली आहे. त्यामुळे  जागा अपुरी पडत आहे. पुढील ४० ते ५०वर्षांची गरज पाहिली तर आहे ही जागा तोकडी पडणार आहे. त्यामुळे एपीएमसीसाठी एक हजार एकर जागेची गरज आहे. न्हावा- शेवा सी लिंकने मुंबई, नवी मुंबई आणि उरण हे भविष्यात महामुंबई निर्माण होणार आहे. त्यामुळे उरण परिसरातील नवीन टाऊन सिटीमध्ये तेवढी जागा उपलब्ध होत असले तर त्या ठिकाणी स्थलांतर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र याबाबत आद्याप हा अधिकृत ठराव झाला नसून बाजार आवारात केवळ तशी चर्चा आहे.

कांदा-बटाटा पुनर्विकास अंतिम टप्प्यात

एपीएमसी बाजार समिती इतर ठिकाणी स्थलांतर होणार अशी चर्चा सुरू असली तरी सध्या कांदा-बटाटा बाजार समितीचा पुनर्विकास हा होणार आहे.  या बाजाराचे बांधा आणि वापरा तत्त्वावर पुनर्विकास होईल अशी शक्यता आहे.

सध्याची बाजार समितीची व्याप्ती वाढली आहे. सुरुवातीला जी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती ती आता अपुरी पडत आहे. बाजार स्थलांतराबाबत अद्याप शासन स्तरावर अधिकृतपणे जाहीर झाले नाही. मात्र भविष्याची व्याप्ती पाहता १ हजार एकर जागेची आवश्यकता आहे.

-अशोक डक, सभापती, एपीएमसी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 175 acres land enough apmc navi mumbai ssh

ताज्या बातम्या