नवी मुंबई महापालिकेचे नियोजन; नेरुळ, ऐरोली रुग्णालयेही सज्ज

नवी मुंबई : निती आयोगाने सप्टेंबरमध्ये भारतात तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला असल्याने नवी मुंबई महापालिकेने आपल्या नियोजनाला गती देण्यास सुरुवात केली आहे. नेरुळ आणि ऐरोली ही दोन्ही रुग्णालये करोना समर्पित करण्यात येणार असून ती सज्ज ठेवा असे आदेश पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आढवा बैठकीत दिले आहेत. तर प्राणवायूची क्षमता ८० टनापर्यंत स्पटेंबपर्यंत करण्यात येणार आहे.

नवी मुंबईत सध्या करोनाची परिस्थिती आटोक्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून ५० पेक्षा कमी रुग्ण सापडत आहेत. सोमवारी २० रुग्ण सापडले होते, तर मंगळवारी ३८ नवे रुग्ण होते. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या ७२३ पर्यंत खाली आली आहेत. हे चित्र शहरासाठी दिलासादायक असले तरी दुसऱ्या लाटेतील अनुभव पाहता व  तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता पालिका प्रशासनाने तयारी ठेवली आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतलेल्या आढवा बैठकीत ऐरोली व नेरुळ ही दोन्ही रुग्णालये कोव्हिडमध्ये रूपांतरित करण्यात येणार असून या ठिकाणी प्रत्येकी दोनशे खाटा असणार आहेत. तसेच तिसऱ्या लाटेमध्ये मुले बाधित होण्याचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता असल्याने या दोन्ही रुग्णालयात प्रत्येकी ८० खाटा या लहान मुलांसाठी असतील. तेथील रंगसंगती आणि व्यवस्था ही मुलांच्या मानसिकतेला साजेशी असावी याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले.

या दोन्ही रुग्णालयातील

खाटा, प्राणवायूपुरवठा प्रणाली व इतर विद्युत कामे करून सप्टेंबरच्या मध्यापर्यंत ही दोन्ही रुग्णालये वापरात यावीत असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मयूरेश चेंबर्स येथील ५८५ प्राणवायू खाटा व पोळ फाऊंडेशन येथील ५५० प्राणवायू खाटांचे कामही तत्परतेने करण्याचे निर्देश दिले आहेत.

नवी मुंबई महापालिकेने ९३ टक्के प्राणवायू साठा क्षमतेचे नियोजन केले आहे. सध्या नवी मुंबईत २० टन प्राणवायूची क्षमता आहे. आणखी या क्षमतेच्या दोन टाक्या ३० ऑगस्टपर्यंत दाखल होणार आहेत. त्या अगोदर त्यासाठी लागणारी बांधकाम व इतर सुविधा तयार ठेवण्यात याव्यात. याशिवाय १० सप्टेंबपर्यंत आणखी एक २० टन क्षमतेची टाकी उपलब्ध होणार आहे. म्हणजे सप्टेंबपर्यंत शहरात ८० टन प्राणवायू साठवण क्षमता निर्माण होणार आहे. उर्वरित १५ टन प्राणवायू क्षमतेच्या टाकीची प्रक्रिया सुरू आहे.

कोव्हिडच्या यापूर्वींच्या लाटांपेक्षा तिसरी लाट अधिक धोकादायक असेल असे तज्ज्ञांकडून सांगितले जात असून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, सतत हात स्वच्छ ठेवणे ही त्रिसूत्रीच कोव्हिडच्या विषाणूला आपल्यापासून दूर ठेवणारी आहे. सध्या करोनाबाधितांची संख्या कमी झालेली दिसली तरी आता कोरोना संपला असे न समजता नागरिकांनी करोनाचा डेल्टा विषाणू अधिक घातक आहे हे लक्षात घेऊन आपल्या आरोग्याविषयी निष्काळजी न राहता कोव्हिड सुरक्षा नियमांचे पालन करावे व लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

चाचण्यांवर भर

करोनाबाधिताच्या संपर्कातील व इमारतीमधील सर्व नागरिकांची करोना तपासणी करण्यात येत आहे. दैनंदिन चाचण्या सरासरी सहा हजार करण्यात येत आहेत. त्यात सातत्य ठेवण्यात यावे.  तसेच रुग्णालयातील आरटीपीसीआर प्रयोगशाळेची क्षमता प्रतिदिन ५ हजापर्यंत वाढविण्यात येणार आहे.